

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दारू पिल्यानंतर केलेल्या मारहाणीत मित्राचा मृत्यू झाला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
एकत्र दारू पिल्यानंतर दोघा मित्रांत वाद झाला. त्यावेळी एका मित्राने दुसर्या मित्राला बांबूने बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या मित्राचा दोन दिवसानंतर मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तौसिफ साजीद बागवान (वय 22,रा. येवलेवाडी कोंढवा) याला अटक केली आहे. सुरेश राजू कसोटिया (डॉ. आंबेडकरनगर, कोंढवा बु.) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.13) सायंकाळी खडीमशीन चौकाजवळील मोकळ्या मैदानात कोंढवा परिसरात घडली आहे. याबाबत सुरेश याचा भाऊ विनोद कसोटिया याने फिर्याद दिली आहे.
आरोपी तौसिफ आणि खून झालेला तरुण सुरेश हे दोघे एकमेकांचे मित्र होते. दोघेही मिळेल ते मजुरीचे काम करत. दारू पिण्यासाठी अनेकदा दोघे एकत्र बसत असत. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दोघे येथील खडीमशीन चौकाजवळील रिलायन्स स्मार्ट मॉलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात एकत्र आले होते. तेथे दोघे दारू पिले. दरम्यान पूर्वीच्या कारणातून दोघांत वाद झाले. त्यावेळी तौसिफ याने सुरेश याला लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. फिर्यादीच्या एका मित्राने सुरेशला तौसिफने मारहाण केल्याचे सांगितले. फिर्यादी हे त्यांच्या भावाला व मित्राला सोबत घेऊन रात्री आठ वाजताच्या सुमारास खडीमशीन चौकातील मोकळ्या जागेत गेले होते. त्यावेळी तेथील एका पत्र्याच्या शेडमधील ओट्यावर सुरेश झोपलेला दिसला.
मारहाणीत सुरेश याच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. तसेच त्याच्या नाकातूनदेखील रक्तस्राव होत होता. फिर्यादीने सुरेश याला विचारणा केली असता, त्याने तौसिफ बागवान याने मारहाण केल्याचे सांगितले. फिर्यादीने सुरेश याला गाडीतून नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यास नेले होते. मात्र, वेदना होत असल्याने तो गाडीतून खाली उतरला नाही. त्यानंतर त्याला घरी नेण्यात आले होते. फिर्यादीची आई स्वतः परिचारिका असल्याने त्यांनी दुसर्या दिवशी सुरेश उठल्यावर त्याच्या पायाला औषध लावून ड्रेसिंग केले व अंगदुखीची गोळी देऊन टीटीचे इंजेक्शन टोचले. रात्री 9 वाजताच्या सुमारास सुरेश याची तब्येत अचानक बिघडली. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच तो मरण पावला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.