सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे साडेपंधरा लाख साखर पोत्यांचे उत्पादन | पुढारी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे साडेपंधरा लाख साखर पोत्यांचे उत्पादन

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील गाळप हंगामात 13 लाख 25 हजार 395 टन उसाचे गाळप केले. सरासरी 11.99 टक्केचा साखर उतारा राखत 15 लाख 54 हजार 625 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले. कोजन प्रकल्पातून 11 कोटी 37 लाख 54 हजार 969 युनिट वीजनिर्मिती केली. 7 कोटी 22 लाख 24 हजार 508 युनिटची विक्री केली. डिस्टिलरी प्रकल्पातून 1 कोटी 11 लाख 50 हजार लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेतले. तसेच 48 लाख 95 हजार 832 लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले, अशी माहिती सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

सोमेश्वर कारखान्याचा रोलर पुजन समारंभ गुरुवार (दि.14) कारखान्याचे संचालक शांताराम कापरे व किसन तांबे यांच्या हस्ते व पुरुषोत्तम जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, ऋषीकेश गायकवाड, प्रवीण कांबळे, लक्ष्मण गोफणे, कमल पवार, प्रणिता खोमणे, अधिकारी, कामगार उपस्थित होते. जगताप म्हणाले, कारखान्याने केलेल्या विस्तारवाढ प्रकल्पाची यशस्वी चाचणी गत हंगामात पार पडली. येणा-या हंगामासाठी तोडणी वाहतूक यंत्रणेचे करारही सुरू केले आहेत. आजपर्यंत 900 बैलगाडी, 250 डंपिंग, 50 ट्रक, 390 ट्रॅक्टर, 9 हार्वेस्टरचे करार पूर्ण झाले असून तोडणी वाहतुकीसाठी पहिल्या हप्त्याचे वाटप 15 जुलैपासून करणार आहोत.

गत हंगामात ऊसबिलापोटी 20 हजार 123 ऊस पुरवठादारांच्या खात्यावर प्रतिटन 2867 रुपयाप्रमाणे 380 कोटी रुपये वर्ग केले. कामगारांचे पगार वेळेत करीत असून गतवर्षी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल कारखान्याचे सर्व कायम व रोजंदारीत काम करणारे कामगार, अधिकारी यांना 15 दिवसांचा पगार बक्षीस म्हणुन दिला आहे. सुमारे 1 कोटी 9 लाख रुपयांची रक्कमही खात्यावर वर्ग केली आहे, असे जगताप यांनी सांगितले. आगामी हंगाम यशस्वीरीत्या पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन कार्यकारी संचालक आर. एन. यादव यांनी केले. आभार उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी मानले.

संबंधित बातम्या

सोमेश्वर कारखान्याकडे आगामी गाळप हंगामासाठी एकूण 42 हजार 688 एकर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. आडसाली 20734 एकर क्षेत्राची नोंद झाली आहे. नोंदलेल्या एकूण 42 हजार 688 एकर ऊस क्षेत्रातून बेणे व इतर वजा जाता अंदाजे 15 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून, त्याचे वेळेत गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.
– पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष सोमेश्वर कारखाना.

Back to top button