पुरंदर: शिवसेनेचे भानुदास मुळीक यांचे संचालकपद रद्द; तीन अपत्यांमुळे अध्यक्षपदही गमावले | पुढारी

पुरंदर: शिवसेनेचे भानुदास मुळीक यांचे संचालकपद रद्द; तीन अपत्यांमुळे अध्यक्षपदही गमावले

नायगाव : पिसे (ता. पुरंदर) येथील म्हस्कोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भानुदास मुळीक यांना तीन अपत्ये असल्याने अध्यक्षपदासह संचालकपदही गमवावे लागले आहे. योगेश मुळीक यांच्या आव्हानाने सोसायटीतील शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. अधिक माहितीनुसार, सन 2021-22 ते 2026-27 या कालावधीसाठी पार पडलेल्या म्हस्कोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत भानुदास मुळीक हे संचालकपदी निवडून आले होते. मात्र, 2001 नंतर भानुदास मुळीक यांना तिसरे अपत्य असल्याचे पुरावे देत संचालकपद रद्द करण्याची मागणी योगेश मुगुट मुळीक यांनी केली होती.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क/अ अन्वये कसूरदार असलेले भानुदास मुळीक यांना संस्थेच्या संचालकपदावरून का कमी करण्यात येऊ नये, याचा खुलासा करण्यासाठी दि. 7 जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली. दि. 7 जून रोजी जाब देणार व तक्रारदार दोघेही हजर न राहिल्याने दि. 5 जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली. मात्र, भानुदास मुळीक यांनी 5 जुलै रोजी वैद्यकीय कारणास्तव उपस्थित राहता येणार नसल्याचे कारण देत सुनावणीसाठी पुढील तारीख मिळण्याची मागणी केली. त्यामुळे दि. 11 जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली. या वेळी अर्जदार योगेश मुळीक सुनावणीला उपस्थित होते. भानुदास मुळीक हे अनुपस्थित राहिले.

दरम्यानच्या कालावधीत कोणताही लेखी अथवा कागदपत्रांचा खुलासा भानुदास मुळीक यांनी सादर केला नाही. यावरून त्यांना काही म्हणावयाचे नाही, असे निदर्शनास आले. भानुदास मुळीक यांनी निवडणुकीच्या कागदपत्रांत सादर केलेल्या रेशनिंग कार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या प्रतीवरून त्यांना 2001 नंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सहायक निबंधक
श्रीकांत श्रीखंडे यांनी सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 अ (1) नुसार भानुदास मुळीक यांचे संचालकपद रद्द केले.

Back to top button