हडपसर भाजी मंडईत घाणीचे साम्राज्य | पुढारी

हडपसर भाजी मंडईत घाणीचे साम्राज्य

हडपसर : पुढारी वृत्तसेवा: हडपसर येथील भाजी मंडईत गेल्या आठवडाभरापासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे घाणीचे साम्राज्य झाले आहे. तशा वातावरणात भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने भाजी मंडईची स्वच्छता झाली पाहिजे किंवा बीओटी तत्त्वावर नवीन भाजी मंडई उभारली पाहिजे, अशी मागणी भाजी विक्रेत्यांनी केली आहे. हडपसर परिसरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली भाजी मंडई सर्वांत जुनी आहे. मात्र, या मंडईची दुरवस्था पाहिल्यास भाजी घेणार्‍या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

भाजी मंडईत दारू पिणार्‍यांची रात्री-अपरात्री वर्दळ सुरू असते. मोकळ्या ठिकाणी स्वच्छतागृहाचा वापर वाढल्याने रोगराई वाढली आहे. अधिकृत भाजीविक्रेते सुमारे साडेनऊशे असून, त्यांच्याकडून भाडेपोटी दररोज वीस ते तीस रुपये मंडई निरीक्षक गोळा करतात. त्यातच अनधिकृत भाजी विक्रेत्यांची संख्या सुमारे 500 च्या घरात आहे. त्यांच्याकडून पालिका मंडई कारवाई नावालाच करते, काही संघटनेचे व पदाधिकारी चिरमिरी घेऊन अनधिकृत भाजी विक्रेत्यांना मदत करतात.

हे भाजी विक्रेते मुख्य रस्त्याच्या कडेला, काहीजण मंडईच्या कोपर्‍यावर व्यवसाय करतात. अनेकवेळा त्यांची रस्त्यावर अडचण होऊन वाहतूक कोंडी होते. भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सोडवू असे प्रत्येक राजकीय पुढारी आश्वासन देतात, मात्र परिस्थिती आहे तशीच आहे. वापरा, बांधा व हस्तांतर करा, या तत्त्वावर भव्य अशी इमारत होणार होती. हडपसरच्या मंडईबाबत पालिकेत किती प्रश्न उपस्थित केले, असा प्रश्न नागरिक व भाजी विक्रेते करीत आहेत.

नवी इमारत झाल्यावर भाजी विक्रेत्यांचे प्रश्न मार्गी लागतील व या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. मात्र, ही समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. मुसळधार पावसामुळे ड्रेनेजचे पाणी सर्वत्र पसरल्याने भाजी विक्रेत्यांना आजाराला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी पालिका वेळेवर स्वच्छता करीत नसल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

पंडित नेहरू भाजी मार्केटमध्ये साफसफाई दररोज केली जाते. खोलगट भाग असल्याने पावसाळ्यात पाणी साचते. मला हडपसर पूर्व भागातील सर्व भाजी मंडईकडे लक्ष द्यावे लागते. तरीही वेळेवर सफाई केली जाते.

– साबीर पटेल, मंडई निरीक्षक, प. जवाहरलाल नेहरू भाजी मार्केट हडपसर

Back to top button