पुणे : पोलिस वसाहतीत डुकरांचा उच्छाद; दुर्गंधीने औंधमधील रहिवासी त्रस्त | पुढारी

पुणे : पोलिस वसाहतीत डुकरांचा उच्छाद; दुर्गंधीने औंधमधील रहिवासी त्रस्त

पुणेः पुढारी वृत्तसेवा: औंध येथील बॉडीगेट पोलिस वसाहतीत डुकरांचा मोठा वावर वाढला आहे. भटक्या श्वानांच्या त्रासाबरोबरच आता येथील नागरिकांना डुकरांचादेखील उच्छाद सहन करावा लागत आहे. दहा ते पंधरा डुकरांचा एक कळप दिवसभर परिसरात फिरत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. येथे राहणार्‍या पोलिस कुटुंबीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसामुळे ठिकठिकाणी वसाहतीत पाण्याची डबकी साचली आहेत, त्यामध्ये ही डुकरे दिवसभर फिरत असतात. अनेक ठिकाणी डुकरांच्या कळपाने खड्डे करून ठेवले आहेत. त्यामध्येच ते आपले मलमूत्र विसर्जित करतात.

वसाहतीच्या पाठीमागे कचराकुंडीतील कचर्‍यावर फिरून आल्यानंतर डुकरांचा कळप थेट नागरिक राहात असलेल्या वसाहतीच्या परिसरात दाखल होतो. पोलिस चौकीपर्यंत हा कळप फिरत असतो. अनेकदा दुचाकीवरून जाणारे कर्मचारी तसेच वसाहतीत खेळत असलेल्या लहान मुलांवर हा कळप हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. भटक्या स्वरूपात डुकरे पाळणारी अशी अनेक लोकं शहरात आहेत. त्यांच्याकडून मोकळ्या परिसरात डुकरांना सोडून दिले जाते. मात्र, त्यांच्या या व्यवसायापोटी अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेदेखील चित्र आहे.

Back to top button