पुणे : उच्चशिक्षित तरुणाने शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविल्या शासकीय योजना | पुढारी

पुणे : उच्चशिक्षित तरुणाने शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविल्या शासकीय योजना

सासवड; पुढारी वृत्तसेवा: सरकारच्या योजनांचा लाभ शेतकर्‍याला देण्याचा ध्यास आंबळे (ता. पुरंदर) गावातील भूषण सूर्यकांत जगताप या उच्चशिक्षित तरुणाने घेतला आहे. सरकारच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांच्यामुळे या भागातील अनेक शेतकर्‍यांनी सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे. व्यवस्थापनातील पदवी मिळवलेल्या जगताप यांच्यामुळे आंबळे गावात प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेतून पंधरा सौरपंप बसले आहेत. ही योजना राबविणारे आंबळे हे पुरंदर तालुक्यातील एकमेव गाव आहे.

प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ गावातील शेतकर्‍याला कसा होईल, त्यातुन त्या शेतकर्‍याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, याचा ध्यास जगताप यांनी घेतला आहे. त्यासाठी जगताप याने गोविंद शेतकरी सेवा केंद्र स्थापन केले आहे. यामार्फत तो शेतकर्‍यांना नवनवीन योजनांचा लाभ मिळवून देतो. सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) परवाना असलेले गोविंद शेतकरी सेवा केंद्रामार्फत जगताप हे प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ गावातील शेतकर्‍यांना करून देतात.

भूषण याने प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी गावातील शेतकर्‍यांकडून अर्ज भरून घेतले. 15 शेतकर्‍यांना सौर कृषिपंप मंजूर झाले आहेत. काही शेतकरी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकर्‍यांच्या शेतात पंप बसलेसुद्धा आहेत. सौरपंपामुळे शेतकरी आता वीज नसतानाही शेतीला पाणी देत आहे. शासनाच्या महाडीबीटी योजनेत आत्तापर्यंत गावातील 30 शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. नुकताच एका शेतकर्‍याला अनुदानित ट्रॅक्टर मिळाला. 10 शेतकर्‍यांना ट्रॅक्टरची अवजारांचे अर्ज भरून त्यांना 35 ते 50 हजार अनुदान मिळाले आहे.

काही शेतकर्‍यांना फळबागांसाठी ठिबक सिंचन मंजूर झालेले आहे. तसेच जनावरांच्या खाद्यासाठी कुट्टी मशिनसाठी अर्ज भरून त्यांना 15 ते 20 हजारांपर्यंत अनुदानाचा लाभ करून दिला आहे. ज्या शेतकर्‍यांकडे शेततळे आहे, परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांनी शेततळ्यात कागद टाकला नाही अशांना शेततळे कागदाचे अनुदान त्यांनी मिळवून दिले. औषध फवारणी पंपाचाही लाभ त्यांनी शेतकर्‍यांना मिळवून दिला आहे. तसेच ई-श्रम कार्डची जास्तीत जास्त शेतकर्‍यांची नोंदणी त्यांनी केली आहे.

Back to top button