बारच्या उद्घाटनासाठी रस्ता बंद | पुढारी

बारच्या उद्घाटनासाठी रस्ता बंद

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: पुण्याची संस्कृती बदलत चालली असली, तरी बार आणि पबचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना पाठबळ देणारेही वाढताना दिसत आहेत. बालेवाडी हायस्ट्रीट कमिन्स कंपनीजवळ तर एका पबच्या उद्घाटनासाठी गेले दोन दिवस पूर्ण रस्ता बंद करण्यात आला आहे. यावर नागरिकांनी वारंवार तक्रार दिली, तरीही प्रशासनाकडून काहीही होत नसल्याची खंत या नागरिकांनी व्यक्त केली. या बार व पबवाल्यांचा नेमका पाठीराखा कोण, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला.

बाणेर, बालेवाडी, औंध परिसरामध्ये अनेक पब व बार असून, याचा त्रास नागरिकांना होतच आहे; परंतु गेल्या दोन दिवसांपासून अख्खा रस्ता गुरुवारी दुपारपासून बंद केला असल्याचे लक्षात येत आहे. रस्त्यावरच स्टेज टाकण्यात आला आहे. याबाबत नागरिकांनी पोलिस यंत्रणेला कळवले. तरीही रस्ता खुला करण्यात आला नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. मुळातच रस्ता बंद करण्याइतके धाडस त्यांच्यात येथे कुठून, अशी विचारणा नागरिक करीत आहेत. याबाबत चतुशृंगी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक कोळी यांनी सांगितले की, या बाबत माहिती मिळाली असून कर्मचार्‍यांना कारवाईसाठी पाठवले आहे. प्रत्यक्षात बघून संबंधितांवर कारवाई केली जाईल. रस्ता खुला करण्याची कारवाई सुरू केली आहे.

Back to top button