पालिकेला भूर्दंड दोनशे कोटींचा; जलसंपदा विभागाने जलदरात केलेल्या वाढीचा फटका | पुढारी

पालिकेला भूर्दंड दोनशे कोटींचा; जलसंपदा विभागाने जलदरात केलेल्या वाढीचा फटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जलसंपदा विभागाकडून जलदरात वाढ केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा दरवर्षी पाणीपट्टीचा खर्च तब्बल 94 कोटींनी वाढला आहे. महापालिकेला नव्या जलदरानुसार नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल 200 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, 100 ते 125 टक्के अतिरिक्त पाणीवापराकरिता अनुज्ञेय दराच्या दीडपट, तर 125 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीवापरास अनुज्ञेय दराच्या तिप्पट आकारणी करण्यात येणार आहे.

जलसंपदा विभागाकडून राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार घरगुती वापरासाठी प्रतिहजार लिटरला 30 ते 60 पैसे, औद्योगिक प्रक्रिया उद्योगांना 6.20 ते 12.40 रुपये आणि कच्च्या मालावर प्रक्रिया करणार्‍या उद्योगांना 45 ते 90 रुपये वाढ करण्यात आली आहे. नवे दर 1 जुलैपासून सुरू झालेल्या जलवर्षापासून लागू करण्यात आले आहेत. या दरात सन 2023-24 मध्ये दहा टक्के, तर सन 2024-25 या जलवर्षासाठी 20 टक्के वाढ होणार आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. ही धरणे जलसंपदा विभागाच्या मालकीची आहेत. त्यामुळे महानगरपालिकेला पाणी वापरापोटी जलसंपदा विभागाला पाणीपट्टी भरावी लागते. आतापर्यंत ही पाणीपट्टी प्रतिवर्षी 105.6 कोटी रुपये एवढी भरावी लागत होती. नव्या दरानुसार त्यामध्ये 94.4 कोटींनी वाढ होऊन आता प्रतिवर्षी तब्बल 200 कोटी रुपये पाणीपट्टी द्यावी लागणार आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून थेट पाणी उचलल्यास 55 पैसे आणि कालव्यातून उचलल्यास 1.10 पैसे (प्रति एक हजार लिटर) दर करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकारच्या दरांत अनुक्रमे 30 पैसे आणि 60 पैसे एवढी वाढ करण्यात आली आहे. महानगरपालिका दररोज खडकवासला धरणातून 1500 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पेक्षा जास्त पाणी उचलते. सध्या महापालिकेला 11.83 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीकोटा मंजूर आहे. दरवर्षी महानगरपालिका 16 ते 17 टीएमसीपेक्षाही जास्त पाणी वापरते. त्यामुळे महानगरपालिकेला पाणीपट्टीपोटी जादा रक्कम भरावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वर्ष प्रत्यक्ष वापर
(टीएमसीमध्ये)
2013-14 15.95
2014-15 15.83
2015-16 16.50
2016-17 16.71
2017-18 18.71
2018-19 17.02
2019-20 18.24
2020-21 18.30

Back to top button