अखेर दहा दिवसांनंतर सूर्यदर्शन; आता 21 जुलैपर्यंत हलक्या सरींचा अंदाज

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात जुलैच्या 15 दिवसांत 328 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारपासून मात्र पाऊस काहीसा ओसरण्याची शक्यता असून, आगामी पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. गेले दहा दिवस शहरात संततधार सुरू होती, सूर्यदर्शनही नव्हते. अखेर शुक्रवारी दुपारी थोडावेळ सूर्यदर्शन झाल्याने पुणेकरांना हायसे वाटले. मात्र, सायंकाळी पाचनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सकाळी शहरातील काही भाग कोरडा, तर काही भागांत मुसळधार पाऊस होता.
कमाल तापमानात किंचित वाढ
शहराचे कमाल व किमान तापमान अगदी जवळ आले होते. दोन दिवसांपूर्वी कमाल 23, तर किमान तापमान 20 अंशावर होते. मात्र, शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला. थोडी उघडीप मिळताच कमाल तापमान 25 अंशावर गेले. पुणे, पाषाण, लोहगाव, चिंचवड या भागाचे कमाल तापमान 25, तर लवळे 23, मगरपट्टा भागाचे 27 अंशावर गेले होते.
आर्द्रता 95 टक्के; पाच दिवस हलका पाऊस
शहराच्या चहूबाजूंनी काळ्याशार ढगांची गर्दी झाली आहे. सायंकाळी ढगांचा प्रवास शहराच्या पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे सुरू झाला होता. त्यामुळे आगामी पाच दिवस 16 ते 21 जुलैपर्यंत शहरात हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.