‘चायनीज फ्रॉड’चा मोर्चा आता पुण्याकडे | पुढारी

‘चायनीज फ्रॉड’चा मोर्चा आता पुण्याकडे

महेंद्र कांबळे

पुणे : चायनीज फ्रॉडने आपला मोर्चा उत्तरेनंतर पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराकडे वळविल्याचा प्रकार काही तक्रारींवरून समोर आला आहे. मूळच्या चायनीज लोन अ‍ॅपच्या विळख्यात तरुणाई अडकत चालली असून, याच माध्यमातून तरुण-तरुणींचे चारित्र्यहनन करण्याचे प्रकार घडत आहेत. अवघ्या महिनाभरात कर्जाच्या अ‍ॅपच्या सायबर पोलिसांकडे 500 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. सायबर पोलिसांनी सांगितले की, हा मूळचा चायनीज प्रकार आहे. मूळ रॅकेट चालविणारे चायनीज लोक आहेत. हा सगळा पैसा वेगवेगळ्या मार्गाने परदेशात जातो.

हे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. हे लोक नागरिकांना त्रास देण्यासाठी काही कॉल सेंटरला काही काम देतात. ‘आरबीआय’ने मान्यता दिलेली व्यवस्था नसून, ज्याला मान्यताच नाही, अशा कर्ज देणार्‍या अ‍ॅपचा आधार घेणे नागरिकांनी टाळले पाहिजे. खासगी सावकारीपेक्षा हा भयंकर प्रकार आहे. हे लोक केवळ फोन करून शिवीगाळ करून थांबत नाहीत, तुमचा मोबाईलचा कॅमेरा, तुमच्या मोबाईलमधील वैयक्तिक डाटा हॅक करतात. त्यातील माहितीचा गैरवापर करतात. त्या आधारे तुमचे फोटो मॉर्फ करून त्याला अश्लील स्वरूप देतात. ते मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठवतात. या त्रासाला वैतागून लोक पैसे भरतात.

पैसे भरल्यानंतर हे आणखी पैसे तुमच्या अकाउंटवर टाकून तुम्हाला व नातेवाइकांना त्रास देतात. या प्रकारात त्रासाला कोठेही अंत नाही.
नुकतेच उच्चशिक्षित तरुणाला गुगल प्ले स्टोअरवरून कॅश अ‍ॅडव्हान्स व स्मॉल लोन हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडण्यात आले. त्याद्वारे सायबर चोरट्यांनी त्याचा मोबाईल हॅक केला. त्यानंतर मागणी केलेली नसतानाही तरुणाच्या बँक खात्यात पैसे पाठविले आणि तेच पैसे व्याजासह परत देण्यासाठी धमकी देत त्याच्याकडून 13 लाख 87 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाबद्दल अश्लील व बदनामीकारक मेसेज पाठवून त्याची बदनामी केली आहे.

याप्रकरणी 30 वर्षीय तरुणाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून कॅश अ‍ॅडव्हान्स व स्मॉल लोनचे मालक आणि अनोळखी मोबाईलधारक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार 2021 ते जून 2022 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आंबेगाव बुद्रुक परिसरात राहण्यास आहे. तो एका शासकीय रुग्णालयात नोकरीस आहे. दरम्यान, त्याने ऑनलाइन जाहिरात पाहून कॅश अ‍ॅडव्हान्स व स्मॉल लोन या अ‍ॅपमधून अडीच हजार रुपयांचे लोन घेतले होते.

त्यासाठी इतर माहितीदेखील घेतली होती. तरुणाने अडीच हजारांचे लोन फेडले देखील, पण त्याने मागणी न करता त्याला पुन्हा लोन देण्यात आले. त्याची रक्कम लोनच्या व्याजासह त्याला भरण्यास भाग पाडण्यात आले. या सायबर गुन्हेगारांनी त्याला वेळोवेळी एकूण अशा पद्धतीने मागणी न करता तब्बल 7 लाखांचे लोन देऊन त्याच्याकडून बदल्यात 13 लाख 87 हजार रुपये उकळले. अधिक तपास पोलिस निरीक्षक चिंतामण हे करत आहेत.

खालच्या स्तरावर जाऊन होते बदनामी
तरुण-तरुणींकडून पैसे उकळत असताना त्यांचा मोबाईल हॅक केला जातो. त्यांच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन अनधिकृत प्रवेश करून त्यांचे कॉन्टॅक्ट हॅक केले जातात. त्या कॉन्टॅक्टना कर्ज घेणार्‍याच्या नावावर अश्लील व बदनामीकारक मेसेज पाठवून त्यांची बदनामी केली जाते. पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याचीही धमकी दिली जाते. अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन नागरिकांची बदनामी केले जात असल्याचे प्रकारही या निमित्ताने समोर
आले आहेत.

प्ले स्टोअरवर खूप सारी कर्जाची अ‍ॅप आहेत. ही लोन अ‍ॅप तुमची कोणतीही क्रेडिबिलिटी न पाहता दोन तीन हजार रुपये टाकून तेच पैसे तुमच्याकडून कितीतरी पटीने वसूल करतात. त्यामुळे थोड्याशा ऑनलाईन कर्जाला बळी पडू नका. ते खंडणी उकळण्याचे माध्यम झाले आहे. 100 टक्के खंडणी उकळण्यासाठीच ही यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कर्जाच्या विळख्यात अडकण्यापासून सावध राहिले पाहिजे. लोन अ‍ॅपवरून कर्ज घेणे म्हणजे या दृष्ट चक्रात स्वतःला अडकवून घेणे अशीच सध्याची परिस्थिती आहे.

– अंकुश चिंतामण, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

Back to top button