पुणे : खेडच्या पूर्व भागातील रस्ते जलमय | पुढारी

पुणे : खेडच्या पूर्व भागातील रस्ते जलमय

वाफगाव, पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पूर्व भागात आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, सततच्या पावसाने शेतात पाणी साचले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दोन दिवस असाच पाऊस पडत राहिल्यास सोयाबीन व इतर पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

आठवड्यापासून खेडच्या पूर्व भागात दमदार, तर काही ठिकाणी भिज पाऊस पडत आहे. जुलै महिन्यात पावसाची सुरुवात झाल्याने पूर्व भागातील नदी- नाल्यांना पाणी वाहू लागले. विहिरींना व पाझर तलावात पाणीसाठ्यात वाढ झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र आता पाऊस थांबत नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक गावातील दळणवळण ठप्प झाले.

रस्त्यांवर ठिक-ठिकाणी तसेच शेतातही पाणी साचले असून पिके जाण्याचा भीतीने शेतकरी चिंतेत आहेत. गुळाणी, वाफगाव, कनेरसर, वरुडे, पूर, जऊळके, चिंचबाईगाव, गोसासी, वाकळवाडी, जरेवाडी, गाडकवाडी या परिसरात शेतातील कामे थंडावली आहेत. काही ठिकाणी शेतकरी पिकातील पाणी शेताबाहेर काढून टाकत आहेत.

लागवडीअभावी बटाटे सडू लागले

खरीप हंगामातील पेरण्या पावसाने ओढ दिल्याने उशिरा झाल्या. मात्र, आता संततधार पावसाने जमिनीला वाफसा येत नसल्याने नवीन लागवडी थांबल्या आहेत. अनेक शेतकर्‍यांनी बटाटा बियाणे आणून ठेवले आहेत, परंतु, वाफशाअभावी लागवडी होत नसल्याने बटाटा बियाणे सडू लागले आहेत.

Back to top button