महामार्ग सेवा रस्त्यावर जीवघेणे खड्डे | पुढारी

महामार्ग सेवा रस्त्यावर जीवघेणे खड्डे

वारजे; पुढारी वृत्तसेवा: स्व. रमेश वांजळे हायवे चौक उड्डाणपूल येथून चांदणी चौकाकडे जाणार्‍या आणि येणार्‍या महामार्ग प्राधिकरण अंतर्गत महामार्ग सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. पडलेल्या या मोठ्या आकाराच्या खड्ड्यांमुळे लहान-मोठ्या वाहनचालकांना हा प्रवास अपघातसदृश झाला असून, धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्याने सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

माई मंगेशकर हॉस्पिटलसमोरील महामार्ग सेवा रस्त्यावर जवळपास दहा फूट लांब असा मोठा जीवघेणा खड्डा पडला आहे. त्या शेजारी अजून एक मोठ्या आकाराचा खड्डा पडलेला असून, रस्त्यावरील वाहतूक धोकादायक झाली आहे. मोठ्या आकाराच्या या दोन खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने बर्‍याच वेळा वाहने जोरात खड्ड्यात आदळून लहान स्वरूपाचे अपघात होत आहेत.

Back to top button