लॉकडाउननंतर यंदा मुडदूसचे रुग्ण वाढले | पुढारी

लॉकडाउननंतर यंदा मुडदूसचे रुग्ण वाढले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोनाच्या काळात मुले लॉकडाउनमुळे दोन वर्षे घरी होती. या काळात व्हिटॅमिन-डीची मोठ्या प्रमाणात कमतरता भासल्याने मुलांच्या हाडांवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळेच मुडदुसाचे रुग्ण वाढल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले आहे. कोरोनापूर्वी अस्थिरोगतज्ज्ञांकडे मुडदूसच्या महिन्याला 5-6 तक्रारी यायच्या. आता हे प्रमाण 25-30 इतके वाढले आहे. लॉकडाऊनमुळे मुले घरी होती. तरी त्यांचे हे वाढीचे आणि हाडांच्या बळकटीचे वय आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यासाठी मुलांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. या वयात सूर्यप्रकाशातून मुलांना त्वचेमार्फत व्हिटॅमिन डी मिळते.

मैदानी खेळ खेळल्याने शरीराला लवचिकता मिळते. ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते. यामुळे हाडांची झीज होते आणि हाडे कमकुवत होतात. ड जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात सोयाबिन, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, संत्री, मासे, सुका मेवा, अंजीर यांचा समावेश करावा, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा साळुंखे यांनी सुचवले आहे. अर्भकांमध्येही बरेचदा व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुडदूस हा विकार होण्याची शक्यता असते. अशा बाळांवर सुरुवातीपासून उपचार केले जातात. त्यांना दर दिवशी पाच-सहा मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन डीची आवश्यकता असल्याने त्यांना तोंडावाटे डोस देण्यात येतो.

लॉकडाऊनपूर्वी संचेती रुग्णालयात आम्ही महिन्याला पाच ते सहा रिकेट्सच्या केसेस बघायचो. आता गेल्या वर्षभरामध्ये यात वाढ होऊन साधारण तीस केसेस महिन्याला बाह्यरुग्ण विभागात असतात. रिकेट्समध्ये गुडघ्यापासून पाय वाकडे होतात आणि हाडे दुखतात. सूर्यप्रकाश कमी घेतल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते आणि त्यामुळे हा आजार होतो. लॉकडऊनमध्ये मुले घरीच होती. त्यांना सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात मिळाला नाही. लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभावही कारणीभूत ठरत आहे. पायामधे तयार झालेले व्यंग आणि हाडांच्या दुखण्याच्या तक्रारी घेऊन येणार्‍या सर्व मुलांना शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते. औषधे, व्यायाम आणि सूर्यप्रकाश घेऊन मुले हळूहळू पूर्ण बरी होतात.
 

– डॉ. संदीप पटवर्धन, पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट, संचेती रुग्णालय

Back to top button