पौड; पुढारी वृत्तसेवा: मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट व परिसरातील पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. पुणे विभाग उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी या संदर्भातील आदेश दिला आहे. त्यानुसार वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972, कलम 27, 28 व 33 अन्वये ताम्हिणी (वन्यजीव) अभयारण्य परिसरात पर्यटनासाठी पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ताम्हिणी अभयारण्य परिसरात वेधशाळेने येत्या काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घाट परिसरात अतिवृष्टीने दरड कोसळून व धबधब्याजवळ पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे पुढील जीवितहानी टाळण्याबाबतच्या अनुषंगाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972, कलम 27, 28 व 33 अन्वये ताम्हिणी अभयारण्य परिसरात पर्यटनासाठी पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी, ताम्हिणी यांनी ताम्हिणी अभयारण्य क्षेत्रात पर्यटनास पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सदर कालावधीत या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पुणे विभाग उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिले.