

पिंपरी : नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमयचा आवारातील 67 झाडे परस्पर खासगी यंत्रणेमार्फत तोडून त्याची विक्री केल्याप्रकरणी उद्यान विभागाचे सहायक सुपरवायझर संतोष लांडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई आयुक्त राजेश पाटील यांनी गुरूवारी केली आहे.
महापालिकेच्या नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमयचा आवारातील विविध जातीचे 107 झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली होती. त्यातील 67 झाडे उद्यान विभागाचे सहायक सुपरवायझर संतोष लांडगे यांनी तोडून विकली.
हॉकी स्टेडियमचा क्रीडांगण विस्तारीकरणासाठी वृक्ष काढण्याची विनंती क्रीडा विभागाने उद्यान विभागाकडे केली होती.
तेथील 95 सुबाभुळ, 2 कडूलिंब, 3 पेल्टाफोरम, 1 निलगिरी, 6 बेहडा अशी एकूण 107 पूर्ण वाढलेली वृक्ष पूर्णपणे काढण्यास वृक्ष प्राधिकरण समितीच्या 7 डिसेंबर 2021 च्या सभेत परवानगी देण्यात आली होती. जानेवारी 2022 मध्ये धोकादायक 35 सुबाभुळ झाडे काढण्यात आली. उर्वरित झाडे क्रीडांगण विस्तारीकरणाच्या काम सुरू झाल्यानंतर काढण्यात येणार होती.
मात्र, उद्यान विभागाचे सुपरवाझर संतोष लांडगे यांनी वरिष्ठांना पूर्वकल्पना न देता परस्पर 2 जूनला तेथील 67 झाडे खासगी यंत्रणेमार्फत तोडली. त्यात 58 सुबाभुळ, 2 कांचन, 2 कडूलिंब, 1 पिंपळ, परवानगी नसलेले 1 कांचन, 2 कडूलिंब, 1 पिंपळ वृक्षाचा समावेश आहे. तोडलेली लाकडे उद्यान विभागात जमा न केल्याचे 16 जून 2022 ला अधिकार्यांच्या निर्दशनास आले. त्यावरून सुपरवाझर लांडगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
तोडलेली लाकडे उद्यान विभागाच्या गुलाब पुष्प उद्यानात जमा केल्याचा खुलासा लांडगे यांनी केला. मात्र, त्या दिवशीच्या रजिस्टरमध्ये ती लाकडे उद्यान विभागात जमा केल्याच्या नोंदी नाहीत. त्याचा खुलासा दिशाभूल करणारा असून, लांडगे यांनी लाकडाची विक्री केल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेची आर्णूक करून गैरकृत्य केल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी सुपरवाझर लांडगे यांना निलंबित केले आहे. त्या प्रकरणी विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.