पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहरात विविध ठिकाणी एकूण 195 सार्वजनिक उद्याने आहेत. यापुढे उद्यानात प्रवेश करण्यासाठी एका व्यक्तीस 20 रुपये, तर बालकास 10 रुपयांचे तिकीट फाडावे लागणार आहे. उद्यान सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत खुले असणार आहे. पालिकेने शहरभरात आकर्षक अशी वेगवेगळ्या रचनेत सार्वजनिक उद्याने विकसित केली आहेत.
त्या उद्यानात दररोज ज्येष्ठ नागरिक, नागरिक व बालगोपाळ गर्दी करतात. फेरफटका मारणे, व्यायाम करणे, जॉगिंग करणे, ओपन जीमवर व्यायाम करणे, खेळण्याचा नागरिक उद्यानाचा आनंद घेतात. सुटीच्या दिवशी तर, उद्यानात झुंबड उडते. पालिकेचे एकूण 195 सार्वजनिक उद्याने आहेत. ती एकूण 460 एकरमध्ये उभारली आहेत. काही उद्यानामध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट आहे.
पालिकेने शाहूनगर, पूर्णानगर येथे नव्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे अटल बिहारी वाजपेयी उद्यान विकसित केले आहेत. तर, पिंपळे गुरवमध्ये राजमाता जिजाऊ (डायनोसोर पार्क) उद्यानात दुबईच्या धर्तीवर कारंजे व प्रकाश व्यवस्था केली आहे. संभाजीनगर येथे बर्ड व्हॅली उद्यानात लेझर शो करून सुशोभीकरण केले आहे.
उद्यान खुले ठेवण्याची वेळ सकाळी 10 ते रात्री 8 अशी दिवसभर असणार आहे. बर्ड व्हॅलीत लेझर शो सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत सुरू असणार आहे. या तीन उद्यानात एका व्यक्तीस 20 रूपये व 12 वर्षांपर्यंतच्या बालकास 10 रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
नागरिकांना तिकीट लागू करण्याचा उद्यान विभागाच्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे पालिका उद्यानात तिकीट फाडल्यानंतर प्रवेश मिळणार आहे.