पुणे : शंभर वर्षे जुन्या वाड्याची धोकादायक भिंत कोसळली | पुढारी

पुणे : शंभर वर्षे जुन्या वाड्याची धोकादायक भिंत कोसळली

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा: संततधार पावसामुळे शंभर वर्ष जुन्या वाड्याच्या मातीच्या भिंती बाजूच्या घरावर पडून रस्ता बंद झाला. घरात अडकलेल्या अकरा लोकांना ग्रामस्थांनी व अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. दोन्ही घराच्यामध्ये पाच फुटांची मोकळी वाट होती म्हणून अनर्थ टळला. या दुर्घटनेत कोणतीही वित्त व जीवित हानी झाली नाही. गेल्या वीस वर्षांपासून या वाड्यात कोणीही राहात नव्हते. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगामी काळात कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून हा संपूर्ण वाडा जमीनदोस्त करून टाकला.

कोंढवा बुद्रक गावठाणातील शंभर वर्षे जुना एक गुंठ्यातील मातीचा वाडा हा शिवसेनेचे नेते गणेश कामठे यांच्या मालकीचा आहे. गेल्या वीस वर्षांपासून या वाड्यात कोणीही राहात नाही. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वाड्याची भिंत बाजूला असणार्‍या पिंटू खोपडे यांच्या घरावर कोसळली. यामध्ये एका खोलीचे नुकसान झाले. वाडा आणि खोपडे यांच्या घराच्यामध्ये पाच फुटांची गल्ली असल्याने अनर्थ टळला.

पडलेल्या भिंतीमुळे खोपडे यांची येण्याजाण्याची वाट पूर्णता बंद झाली होती. ग्रामस्थ व अग्निशामक दलाच्या जवानांनी वाट मोकळी करून खोपडे यांच्या कुटुंबातील, तसेच अन्य सहा लोकांना सुखरूप बाहेर काढले. पिंटू खोपडे म्हणाले, “ज्या खोलीवर भिंत कोसळली, त्याचा जास्त वापर आम्ही करत नव्हतो. शिवाय सकाळची वेळ असल्यामुळे तिकडे कोणी गेले नव्हते. अन्यथा अनर्थ घडला असता. पण ज्या वेळी वाड्याची भिंत कोसळली, त्या वेळी आम्ही खूप घाबरलो होतो.”

Back to top button