पुणे : भीमाशंकर मंदिराजवळ कायमस्वरूपी राहणार 4 पोलिस | पुढारी

पुणे : भीमाशंकर मंदिराजवळ कायमस्वरूपी राहणार 4 पोलिस

भीमाशंकर, पुढारी वृत्तसेवा : आता उत्तर भारतीय श्रावण सुरू होत आहे व त्यानंतर 15 दिवसांनी आपला श्रावण महिना सुरू होईल. पुढील दीड महिना भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्व तयारी करावी. जादा पोलिस बंदोबस्त हवा असल्यास मागणी करा, तो उपलब्ध करून दिला जाईल, भीमाशंकर मंदिराजवळ कायमस्वरूपी चार पोलिस राहावेत, यासाठी पोलिस अधीक्षकांना सूचना देऊ, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

या वेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश कौदरे, आंबेगावचे प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, खेडचे विक्रांत चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, उपअभियंता सुरेश पटाडे, विद्युत विभागाचे अधिकारी शैलेश गिते, भीमाशंकरचे सरपंच दत्तात्रय हिले इत्यादी उपस्थित होते.

या वेळी राव यांनी मंदिरासमोर नव्याने होणार्‍या सभामंडपाच्या कामाचे नियोजन समजून घेतले. त्यात काही सूचना त्यांनी केल्या. कोणतेही काम करताना स्थानिक ग्रामस्थांना विचारात व विश्वासात घेऊन कामे करा; तसेच बसस्थानकाकडून मंदिराकडे येणारा रस्ता काही ठिकाणी खराब झाला आहे, तो दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. वनविभागाच्या परवानगीत अडकलेली कामे लवकर सुरू व्हावीत, यासाठी बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासनदेखील राव यांनी दिले.

‘निधी कमी पडू देणार नाही’

क्षेत्र भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, देशभरातून येथे भाविक येतात. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यात सुरू असलेल्या कामांची व नव्याने होणार्‍या कामांची पाहणी केली आणि अडचणी समजून घेतल्या. त्यामुळे भीमाशंकर परिसरात विकासाला निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही. भीमाशंकरसाठी आवश्यक असलेली चांगली व नवनवीन कामे सुचवा, ती सर्व केली जातील, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

Back to top button