कळस, पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील शेतीला जलसिंचनाची सुविधा पुरविणार्या सर्व छोट्या-मोठ्या पाझर तलावांमध्ये खडकवासला कालव्याद्वारे तातडीने पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 13) दिली.
पाटील यांनी सांगितले, की सध्या खडकवासला धरण क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने खडकवासला धरण 100 टक्के भरून झाले आहे. जे शेतकरी पाणी मागतील त्यांना पाणी द्या आणि शेतीचे पाणी झाल्यावर शेटफळपासून ते अवसरीपर्यंतचे सर्व पाझर तलाव 100 टक्के पाण्याने भरून द्या, अशी मागणी केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सर्व तलाव भरून घेण्यासंदर्भात पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता पाटील, उप अभियंता परदेशी यांच्याशी चर्चा झाल्यानुसार पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांत आपल्या परिसरात कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी पोहोचल, असेदेखील पाटील यांनी या वेळी सांगितले. राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे आता शेतीला पाणी कमी पडणार नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
पाटील म्हणाले, की लाभ क्षेत्रातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी, कळस, पिलेवाडी, पळसदेव, लोणी, बळपुडी, बिजवडी, तरंगवाडी, गोखळी, वडापुरी, अवसरी, शेटफळ इत्यादी सर्व पाझर तलाव पुर्ण क्षमतेने पाण्याने भरून घेण्यात येणार असल्याने लाभ क्षेत्रातील अनेक गावांमधील शेतीला वर्षभर पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. अनेक गावाच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यांनादेखील वर्षभर पाणी उपलब्ध होणार असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.