भजन, कीर्तन अन् गुरुवंदना; गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी | पुढारी

भजन, कीर्तन अन् गुरुवंदना; गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मंदिरांमध्ये सुरू असलेली भक्तिगीते… भजन-कीर्तन आणि अन्य कार्यक्रमांनी रंगलेली सायंकाळ… फुलांची आकर्षक सजावट… दर्शनासाठी झालेली गर्दी… गुरूंच्या कार्याला वंदन करत बुधवारी (दि.13) गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी झाली होती अन् सकाळी अभिषेक, आरतीसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभही भक्तांनी घेतला. तसेच, गुरुदेव दत्त… दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…च्या जयघोषाने श्रीदत्त मंदिरे दुमदुमून गेली. फुलांच्या सजावटीसह रांगोळ्यांच्या पायघड्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार सजले होते. भर पावसातही भाविक दर्शनासाठी मंदिरांमध्ये आले होते.

बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने मंदिरात व मंदिर परिसरात आकर्षक फुलांची आरास व नयनरम्य विद्युतरोषणाई करण्यात आली. गुरुपौर्णिमेची माध्यान्ह आरती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व कुटुंबीयांच्या हस्ते झाली. मंदिरात गुरुचरणांवर पुष्पांजली अर्पण करतानाचा फुलांचा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. बुधवारी पहाटे 5.30 वाजता हलवाई कुटुंबीयांच्या हस्ते लघुरुद्र झाला. त्यानंतर श्रीनाथ व वंदना भिमाले यांच्या हस्ते श्री दत्तयाग पार पडला. तर, सकाळी 8 वाजता संजय भारुका व उमा भारुका यांच्या हस्ते आरती पार पडली. तसेच, सायंकाळची आरती सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते झाली.

नवीन मराठी शाळेत कार्यक्रम
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत गुरुपौर्णिमा साजरी झाली. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला. शोभना जोगळेकर यांनी गोष्ट सांगितली. स्वाती यादव यांनी गुरुपौर्णिमेची माहिती दिली. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी गुरुशिष्य परंपरा दाखविणारे नृत्य सादर केले.

शिष्यांनी दिल्या शुभेच्छा…
गुरूंच्या कार्याला सलाम करत शिष्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. काहींनी गुरूंचे स्वत:च्या जीवनातील महत्त्व उलगडणारे खास संदेश, छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांनी गुरूंची भेट घेत देऊन शुभेच्छा दिल्या. शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

Back to top button