सूक्ष्म सिंचनाचे 26 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर | पुढारी

सूक्ष्म सिंचनाचे 26 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात महाडीबीटी पोर्टलद्वारे ठिंबक सिंचन व तुषार सिंचनासाठी 44 हजार 208 शेतकर्‍यांचे अर्ज प्राप्त झाले. त्यामधून 11 हजार 722 शेतकर्‍यांची निवड करण्यात आली. 26 कोटी 1 लाख 41 हजार रुपये अनुदानाचे वाटप शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी दिली. गतवर्षातील अनुदानाची रक्कम प्रत्यक्षात चालू आर्थिक वर्षात प्राप्त झाली असून, नुकतेच त्याचे शेतकर्‍यांना वाटप करण्यात आलेले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील 18 कोटी 40 लाख 52 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त आहे.

त्यातून 6 हजार 450 शेतकर्‍यांना 18 कोटी 40 लाख 52 हजार रुपयांचे अनुदान वाटप पूर्ण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत 9 कोटी 10 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यातून 5 हजार 61 शेतकर्‍यांना 7 कोटी 29 लाख 17 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले, तर अटल भूजल योजनेत 89 लाख 28 हजार रुपये अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यातून 211 शेतकर्‍यांना 31 लाख 72 हजार रुपयांचे अनुदान वाटप झालेले आहे. जिल्ह्यास तीनही सिंचन योजनेत मिळून 28 कोटी 39 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यातून 26 कोटी 1 लाख 41 हजार रुपयांचे अनुदान वाटप पूर्ण झाले आहे.

2 कोटी 38 लाख 39 हजार रुपयांचे अनुदानाचे वितरण सुरू आहे. दरम्यान, 2021-22 मधील 1 हजार 226 सिंचन प्रस्ताव पूर्ण असून त्यासाठी साडेतीन कोटी रुपयांइतक्या अनुदानाची गरज आहे. तसा प्रस्ताव फलोत्पादन संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, 2021-22 मधील अनुदानातून 4 हजार 34 हेक्टरइतके क्षेत्र नव्याने सूक्ष्म सिंचनाखाली आले. आहे. 2022-23 मध्ये 6 हजार 763 शेतकरी लाभार्थ्यांची निवड झालेली असून, 1 हजार 907 लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. त्यापैकी 672 लाभार्थ्यांनी बिल ऑनलाईनद्वारे अपलोड केले आहे.

Back to top button