पालिकेत हजेरीसाठी पुन्हा नवीन प्रणाली | पुढारी

पालिकेत हजेरीसाठी पुन्हा नवीन प्रणाली

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या अठरा हजार कर्मचार्‍यांची हजेरी घेण्यासाठी आता पुन्हा आधारबेस अटेन्डन्स ही नवीन प्रणाली वापरली जाणार आहे. गेल्या चार वर्षांत हजेरी नोंदविण्यासाठी घेण्यात येणारे हे चौथ्या प्रकारचे मशिन आहे. महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची हजेरी नोंदविण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर केला जात आहे. महापालिकेची मुख्य इमारत, विविध क्षेत्रीय कार्यालये आणि इतर कार्यालयाच्या ठिकाणी या मशिन बसविल्या आहेत.

कोरोनाची लाट आल्यानंतर ही पद्धत बंद करण्यात आली. त्यानंतर डोळ्यांच्या आधारे हजेरी नोंदविण्यासाठी मशिन घेतली गेली होती. या मशिनही कालांतराने बंद पडल्या. पुन्हा एकदा बोटांच्या ठश्यांच्या आधारे हजेरी नोंदविली जात आहे. आता पुन्हा यात बदल करण्याची कार्यवाही सुरू आहे. नवीन पद्धतीत अधिकारी आणि कर्मचारी यांना ओळखपत्र दिले जाईल. ओळखपत्रावर आधारकार्ड क्रमांक असेल. कार्ड मशिनसमोर धरल्यानंतर क्रमांक पडताळून संबंधितांचे छायाचित्र मशिनवर दिसेल आणि त्यानंतर बोटाचा ठसा नोंदविल्यानंतर हजेरी नोंदविली जाईल.

Back to top button