ससून रुग्णालयात नियमावली | पुढारी

ससून रुग्णालयात नियमावली

पुणे; पुढारी वृत्तसेवा: रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी ससून रुग्णालयाच्या नवीन अधीक्षक डॉ. भारती दासवाणी यांनी कंबर
कसली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात राज्यभरातून रुग्ण उपचारांसाठी येतात. मात्र, बरेचदा बेड उपलब्ध नसल्याचे कारण मिळाल्याने त्यांचा आणि नातेवाईकांचा हिरमोड होतो. उपचारांसाठी शहरातील इतर दवाखान्यांमध्ये धावपळ करावी लागते. बेडची उपलब्धता कळण्यासाठी अधीक्षक कार्यालयात नोंद ठेवली जाणार आहे. बेड उपलब्ध झाल्यावर रुग्णांशी तातडीने संपर्क साधला जाणार आहे.

तसेच, नागरिकांना विविध दाखले सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रियेत गतिमानता आणली जाणार आहे. राज्याच्या तसेच पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमधून ससून सर्वोपचार रुग्णालयात विविध उपचारांसाठी अनेक गरजू रुग्ण मोठ्या अपेक्षेने येतात. रुग्णांसाठी आता अधीक्षक कार्यालयात नोंदवही ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नावासाह आपली माहिती भरून ठेवता येणार आहे. ससून रुग्णालयात जागा उपलब्ध झाल्यास त्यांच्याशी रुग्णालय प्रशासनाकडून संपर्क साधण्यात येणार आहे.

ससून रुग्णालयात तपासणी व प्रमाणीकरणासाठी येणारे मेडिकल बिल, इतर प्रमाणपत्रे याबाबतची प्रक्रिया तातडीने करता यावी यासाठी नियमावली तयार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांची विविध प्रमाणपत्रे, दाखले त्वरित मिळण्यास मदत होणार आहे. शासकीय सेवेत काम करणार्‍यांना त्यांच्या वैद्यकीय बिलावर ससून रुग्णालयातील अधीक्षकांकडून त्यावर सही मिळण्याच्या दृष्टीने लोकाभिमुख प्रक्रिया राबवली जाणार आहे.

ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारणा करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अधीक्षक कार्यालयाकडून नियमावली तयार करण्यात येत आहे. ससून रुग्णालयाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

                                          – डॉ. भारती दासवाणी, वैदयकीय अधीक्षक, ससून

Back to top button