इंद्रायणी, पवनेच्या पाणीपातळीत वाढ

देहूरोड : मावळ तालुक्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे इंद्रायणी आणि पवना नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठी राहणार्या नागरिकांना तसेच ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पवना नदीवरील गहुंजे येथील साकवच्या खालून पाणी वाहत आहे. धरणात पाणी साठा वाढत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या घरांना धोक्याचा इशारा दिला आहे.
इंद्रायणी नदीत पाण्याची पातळी वाढली आहे. पित्ती धर्मशाळा, ओंकारेश्वर मंदिरात पावसाचे पाणी शिरले आहे. नदीच्या घाटावरील पहिल्या टप्प्यापर्यंत पाणी आले आहे. येथील बोट क्लब बंद करण्यात आला आहे. इंद्रायणीला सर्वाधिक धोका आहे तो देहुगाव सुदूंबरे दरम्यानच्या वसंत बंधार्याचे. या बंधार्याला गेल्या दोन वर्षापासून गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नदीतून वाहून आलेला घनकचरा, राडारोडा, व जलपर्णी मोठ्या प्रमाणात अडकल्या आहेत.
बंधार्यावर लक्ष ठेवून
मी व माझे कर्मचारी गेल्या अकरा दिवसापासून बंधार्याजवळ उभे आहोत. प्रवाहाचा अंदाज घेऊन जलपर्णी काढण्याचे काम चालू आहे. ब्लू लाईन व रेड लाईनच्या आत आलेल्या घरांवर पालिकेने कारवाई करावी.
– किशोर चव्हाण, सहाय्यक अभियंता, मोशी पाटबंधारे विभाग