पिंपरी : पावसाने उडवली दाणादाण, शहरात संततधार | पुढारी

पिंपरी : पावसाने उडवली दाणादाण, शहरात संततधार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे सगळीकडे दाणादाण उडाली होती. पिंपरी, चिंचवड, दापोडी, मोशी, चिखली-कुदळवाडी व आकुर्डी भागातील रस्त्यावर काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले. तर काही ठिकाणी रस्त्याची चाळण झाली आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले.

पिंपरी : पवना नदीला आलेल्या पुरामुळे संजय गांधीनगरमधील नदीकाठच्या झोपड्यांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. परिणामी नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड देत घरातील वस्तूची योग्य ठिकाणी हलवाव्या लागल्या. नागरिकांच्या घरातील फर्निचर आणि इलेक्ट्रिकच्या वस्तूंमध्ये पाणी गेल्याने त्या नादुरुस्त झाल्या.तसेच झूलेलाल घाट परिसरात पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
मोरवाडी चौकात पावसाच्या पाण्यामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर अजमेरा ते मोरवाडी चौकात सुरू असलेल्या पदपथाच्या कामामुळे वाहनचालकांच्या नाकीनऊ आले होते. परिणामी वाहतुकीची समस्या उद्भवल्याने वाहनचालकांना लांबच्या लांब रांगेत ताटकळत थांबावे लागले.अजमेरा येथील सम्राट चौकात पावसाचे पाणी साचले होते. चौकातच असलेले अ‍ॅटोरिक्षा स्टँन्ड त्यासमोरच साचलेले पाणी यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवली.

चिंचवड : येथील मोरया गोसावी मंदिराच्या कळसापर्यंत पुराचे पाणी पोहोचले होते. मंदिराच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीत आणि अभिषेक परिसरातही पाणी पाहोचले होते. पावसाच्या जोराने येथील झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. एम्पायर इस्टेट ते मोरवाडी चौकापर्यंत बीआरटी रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, वाहने खड्ड्यातून गेल्यावर बसणार्‍या झटक्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. चिंचवड स्टेशन येथील मनपाच्या नारायण बहिरवडे शाळेच्या आवारात पाणी साचले होते. तर भगवान महावीर चौकातून चिंचवडकडे जाणार्‍या मार्गात पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यातून वाहने जात होती. पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने बरेच दुचाकीचालक पडल्याने किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या.

मोशी : येथील स्पाईनरोड बीआरटी स्थानकासमोरील एचपी पेट्रोल पंपाजवळील गतीरोधकावरील ब्लॉक निघाल्याने मोठा खड्डा पडला होता. साचलेल्या पाण्यातून वाहने चालविताना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन कोलमडली होती. कुदळवाडीकडे जाणार्‍या मार्गात पाणी साचले होते. चौक असल्याने पाण्यातून वाहने सावकाश जात होती. परिणामी वाहतुकीची समस्या उद्भवली होती. मोशी येथील स्पाईनसिटी मॉल समोरही मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.

दापोडी हॅरिस ब्रिज : दापोडी येथील मुळा नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे हॅरिस ब्रिजवरून बोपोडी-औंधकडे जाणारा सबवे बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना हेलपाटा मारावा लागल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

आकुर्डी : आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या दोन्ही रेल्वे बोगद्यात पाणी साचले होते. वाल्हेकरवाडीकडे जाणार्‍या बोगद्यात गुडघाभर पाणी साचल्याने यामधून मार्ग काढणे वाहनचालकांना अवघड होऊन बसले होते. बर्‍याच गाड्यांच्या सायलेंसरमध्ये पाणी गेल्याने वाहने बंद पडली होती.

चिखली वसाहत ः स्पाईन रस्त्याच्या कडेला असलेल्या संभाजीनगर चिंचवड येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणीही ओसंडून वाहिल्यामुळे ते चिखली पेठ क्र.17 आणि 19 येथील घरकूल वसाहतीत शिरते. गेली आठ वर्षांपासून येथील रहिवासी या समस्येला तोंड देत आहेत.

नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दापोडी, गुलाबनगर भागांमध्ये ड्रेनेजचे बॅक वॉटर आले आहे. रावेतमधील 15 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पिंपरीतील लिंकरोड येथील पत्राशेडमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे नियोजन आहे. दापोडी आणि गुलाबनगर येथील लोकांनाही सर्तकतेचा इशारा दिला आहे. त्यांनाही पूर स्थितीनुसार हलविण्यात येणार आहे. पिंपरी व दापोडीतील काही लोक त्यांच्या नातेवाइकांकडे गेली आहेत. ज्यांची राहण्याची व्यवस्था नाही त्यांची पालिका शाळेत व्यवस्था केली आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. अजून आम्ही पाहणी करत आहोत.
                 -ओमप्रकाश बहिवाल, आपत्ती निवारण अधिकारी, मनपा

Back to top button