पिंपरी : योग्य पत्ते नसल्याने कराची बिले परत | पुढारी

पिंपरी : योग्य पत्ते नसल्याने कराची बिले परत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागरिकांना घरपोच मिळकतकराची बिले पोस्टामार्फत पाठविण्यात आली. काही नागरिकांना ती मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. योग्य पत्ते नसल्याने कारण देत पोस्टाने बिले माघारी दिली आहेत. योग्य पत्त्यांची नोंद कर संकलन कार्यालयाकडे नसणे व वाटपास पोस्ट कार्यालयाकडून टाळाटाळ करण्याचा प्रकार या माध्यमातून समोर आला आहे.

कर संकलन विभागाची शहरात 17 विभागीय कार्यालय आहेत. पत्ते न मिळाल्यामुळे 2 हजार 200 बिले पोस्टाने वाकड कार्यालयामध्ये जमा केली आहेत. त्यानंतरही काही भागात पत्त्याअभावी नागरिकांना बिल मिळाली नसल्याची तक्रार असल्यास पुढील आठवड्यात पोस्टाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर बैठकीचे आयोजन केले आहे.

त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात येईल. ज्या परिसरात पत्ते दुरुस्त करायची असतील तेथे पालिकेच्या गट लिपिकामार्फत दुरूस्त करण्यासाठी तातडीने विशेष मोहीम राबविली जाईल. येत्या तीन महिन्यात पत्ते दुरुस्त करण्यात येणार आहेत. मात्र, छपाई व वितरण व्यवस्थेच्या दिरंगाईमुळे अनेकांना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात बिले मिळतात. त्यामुळे नागरिक बिले भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र होते. तथापि, कर भरण्यासही विलंब होत होता. त्यामुळे सन 2022-23 वर्षापासून बिले पोस्टाने घरोघरी वाटण्याचा निर्णय कर संकलन विभागाने घेतला. शहरात एकूण 5 लाख 77 हजार मिळकतींची नोंद आहे.

संकेतस्थळावर फॉर्म भरण्यास ऑनलाइन बिल मिळणार
शहरातील मिळकतधारकांना दरवर्षी बिले वेळेत मिळावी, यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करत आहे. यापुढील काळात एसएमएस, ई- मेलवर बिल पाठविण्याचे नियोजन आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर ‘केवायसी फॉर्म’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फॉर्म मिळकतधारकाने भरावा. यामध्ये मालमत्ता क्रमांक, नाव, सविस्तर पत्ता, मोबाईल नंबर व ई-मेल आयडी भरणे गरजेचे आहे. त्यामुळे दरवर्षी मिळकतधारकांना ऑनलाइन बिले पाठविणे व ऑनलाइन बिल भरणे सोईस्कर होणार आहे, असे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

Back to top button