चाळण झालेले रस्ते बनवणार्‍या ठेकेदारांना दणका | पुढारी

चाळण झालेले रस्ते बनवणार्‍या ठेकेदारांना दणका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने निकृष्ट रस्ते करणार्‍या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जे रस्ते खराब झाले आहेत आणि त्यांचा दायित्व कालावधी अद्याप संपलेला नाही, अशा रस्त्यांची ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घ्यावी तसेच जे ठेकेदार हे काम करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील आणि उपनगरातील रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे. त्यामध्ये अनेक भागांत तर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने तयार केलेल्या रस्त्यांचा समावेश आहे. त्यात पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली, तर काही रस्त्यांचे रिसर्फेसिंग करण्यात आले आहे. अनेक भागांत रस्त्यांवरील खड्ड्यांचे पॅचवर्कही करण्यात आले आहे. मात्र, अवघ्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी केलेले हे रस्ते उखडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता संबंधित ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.

‘त्या’ रस्त्यांची यादी तयार करा
रस्ते तयार करताना त्याचा दोष दायित्व कालवधी महापालिकेकडून निश्चित केला जातो. संबंधित कालावधीत रस्ता खराब झाल्यास अथवा उखडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदाराची असणार आहे. त्यामुळे अशा रस्त्याची यादी घेऊन या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार जे काम मुदतीच्या आत खराब झाले आहे, त्याची दुरुस्ती ठेकेदारासच करावी लागणार आहे. जे ठेकेदार ही दुरुस्ती करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त खेमणार यांनी पथ विभागप्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांना दिले आहेत.

 

Back to top button