पिंपरी : रस्ते डांबरीकरणासाठी 11 कोटी खर्च | पुढारी

पिंपरी : रस्ते डांबरीकरणासाठी 11 कोटी खर्च

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विकासनगर, मामुर्डी येथील ताब्यात आलेले रस्ते डांबरीकरण करून विकसित करण्यात येणार्‍या आहेत. त्यासाठी 10 कोटी 64 लाख खर्च अपेक्षित आहे. त्यासह विविध विकासकामांसाठी सुमारे 30 कोटी खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी बुधवारी (दि.13) झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

विधी समिती, स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आयुक्त पाटील यांनी मंजुरी दिली. या वेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विविध विषयाशी संबंधित अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या इमारत बांधण्यात येणार असून, त्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. चिंचवड येथील झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर लाईट हाऊस प्रकल्पाकरीता आवश्यक स्थापत्य कामे केली जाणार आहेत. पालिकेच्या उद्यान विभागासाठी स्टेनलेस स्टील सिंगल हँगिंग लिटर बीन्स (कचरा डबे) खरेदी करण्यासाठी 72 लाख 45 हजार खर्च आहे.

रावेत येथील मुख्य जलवाहिनीची क्षमता वाढविण्यासाठी व नव्याने पाईपलाइन टाकण्यासाठी 5 कोटी 48 लाख खर्च आहे. भोसरी गावठाण, सँडविक कॉलनी, खंडोबा माळ, शांतीनगर, लांडेवाडी परिसरात मलवाहिनी सुधारणा कामासाठी 43 लाख खर्च आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील कवडेनगर, संत तुकाराम नगर तसेच उर्वरित भागात ड्रेनेज लाइनचे चर बुजविण्यासाठी 26 लाख खर्च आहे.

तळवडे जलउपसा केंद्राच्या वीज जोडसाठी 61 लाख शुल्क
तळवडे येथील नवीन नदी जलउपसा केंद्राजवळच्या उच्चदाब फिडरवरून तात्पुरती वीजजोडणी घेण्यासाठी महावितरण कंपनीस 60 लाख 71 हजार अनामत रक्कम अदा करण्यात येणार आहे. तेथून पाणी उचलून चिखली जलशुद्धीकरण केंद्राकडे पाठविले जाणार आहे.

तृतीयपंथी कर्मचार्‍यांना मोफत वैद्यकीय सेवा
तृतीयपंथी कर्मचार्‍यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे. मोशी येथील आरक्षण क्रमांक 1/171 येथे तात्पुरत्या स्वरूपात वर्गखोल्या बांधणे, प्रभाग क्रमांक 11 मधील मैला शुद्धीकरणजवळील स्पाईन रोड सर्व्हिस रोडलगत खाऊगल्ली सुरू करणे, नागरिकांच्या सोयीसाठी शहरात फूडकोर्ट सुरू करण्याचे धोरण, आदी विषयांना आयुक्तांनी मंजुरी दिली.

Back to top button