नात्यातला दुरावा ‘चव्हाट्यावर’; नातेसंबंधाला कंटाळलेल्या महिला-तरुणी सोशल मीडियावर शोधताहेत आसरा | पुढारी

नात्यातला दुरावा ‘चव्हाट्यावर’; नातेसंबंधाला कंटाळलेल्या महिला-तरुणी सोशल मीडियावर शोधताहेत आसरा

सुवर्णा चव्हाण, पुणे : नातेसंबंधातील कटुता-दुरावा, कौटुंबिक कलह अन् ब्रेकअप… अशा विविध कारणांमुळे 18 ते 50 वयोगटांतील महिला-तरुणींमध्ये नकारात्मक भावना निर्माण होत आहे. हा दुरावा आता ‘सोशल चव्हाट्यावर’ येऊ लागला आहे. आपली ही वेदना मांडण्यासाठी महिला-तरुणी आता सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. महिलांशी निगडित फेसबुकवरील विविध ग्रुप, वैयक्तिक अकाउंटवर पोस्टद्वारे म्हणणे मांडले जात असून, त्यांच्यासारख्या कित्येक महिला-तरुणी त्यांच्या पोस्ट वाचून त्यांना सकारात्मक मार्ग दाखविण्याचे काम करत आहेत.

सध्या कौटुंबिक हिंसाचार, व्यसनाधीनता, ब्रेकअप, नोकरीतील दुय्यम स्थान, व्यवसायातील अपयश… अशा विविध कारणांमुळेही महिला-तरुणींमध्ये नकारात्मक भावना वाढत आहेत. खासकरून नातेसंबंधातील कटुतेमुळे आणि दुराव्यामुळे तर त्यांच्या मनात आत्महत्येचेही विचारही येत आहेत. ते मित्र-मैत्रिणींबरोबर आणि आप्तेष्टांबद्दल याविषयी बोलतात; पण आता सोशल मीडियावरही त्रासाबद्दल बोलत आहेत. आपल्या सोबत घडलेली घटना सांगत आहेत. महिला-तरुणींसाठी सोशल मीडिया व्यक्त होण्याचे प्रमुख माध्यम बनले आहे.

काही महिला आणि तरुणी वैयक्तिक माहितीसुद्धा सोशल मिडियावर टाकतात. असे करताना त्यांनी माहिती गुप्त ठेवण्याबाबतची दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहन समुपदेशकांनी केले. समुपदेशक प्रा. चेतन दिवाण म्हणाले, ‘नकारात्मक भावनेविषयी मित्र-मैत्रिणी, आप्तेष्टांशी बोलत आहेतच; पण आता सोशल मीडियावरही त्या बोलत आहेत आणि त्यांच्या पोस्टला इतर महिला-तरुणी साद देत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. हा तंत्रज्ञानाचा बदल असून, महिला-तरुणींसाठी तो आधार बनला आहे. पण, हे माध्यम वापरताना त्यांनी दक्षता घ्यावी.’

तुम्ही काय कराल?
सोशल मीडियावर मनमोकळेपणाने बोला, पण दक्षता घ्या.
सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती गुप्त ठेवावी.
वेगवेगळ्या हेल्पलाइनशीही संपर्क साधू शकता.
आपल्या त्रासाबद्दल जवळच्या व्यक्तीशी बोलावे.

पोस्टवर पडतो मार्गदर्शनाचा पाऊस
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर महिलांशी संबंधित वेगवेगळे ग्रुप आहेत. त्यावर आता महिला-तरुणी आपल्या त्रासाबद्दल, वेदनेबद्दल बोलत आहेत. एका ग्रुपवर रोज किमान 25 ते 30 पोस्ट टाकल्या जात आहेत. खासकरून नातेसंबंधाला कंटाळलेल्या महिला-तरुणींचे अनुभव येथे पाहायला मिळत असून, या पोस्ट वाचून इतर महिला-तरुणी त्यांना मार्ग दाखविण्याचे काम करत आहेत, त्यांना सहकार्य करत आहेत. महिलाच महिलांना पुढे येऊन मदत करत आहेत. पोस्ट टाकणार्‍या महिला-तरुणीचे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे.

सध्या कुटुंबातील हरवलेला संवाद, कामाचा ताण, एकटेपणा, वैवाहिक जबाबदार्‍या आणि नात्यातील दुय्यम स्थान ही सगळी कारणे महिला-तरुणींमध्ये नकारात्मक भावना वाढवत आहेत. खासकरून नातेसंबंधातील दुरावा आणि कटुतेमुळे त्यांच्यात या भावना निर्माण होत असून, या आणि विविध कारणांनी त्रासलेल्या महिला-तरुणी आमच्या हेल्पलाइनशी संपर्क साधतात आणि त्यांचे म्हणणे मांडतात. मनातील भावना प्रतिनिधींशी बोलत असून, रोज येणार्‍या 10 ते 12 दूरध्वनींपैकी 5 दूरध्वनी महिला-तरुणींचे असतात. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेतो, मनमोकळेपणाने बोलू देतो. मदतीसाठी 9922004305 आणि 9922001122 या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधावा, महिला-तरुणींची माहिती गोपनीय ठेवली जाते.

                                                                       – विरेन राजपूत, कनेक्टिंग ट्रस्ट

Back to top button