पुणे: व्यावसायिकांना गंडा घालणारा तोतया डॉक्टर जेरबंद; शंभरहून अधिक जणांची फसवणूक केल्याचा अंदाज | पुढारी

पुणे: व्यावसायिकांना गंडा घालणारा तोतया डॉक्टर जेरबंद; शंभरहून अधिक जणांची फसवणूक केल्याचा अंदाज

पुणेः एलिव्हेटर (लिफ्ट) आणि मार्बल व्यवसायिकांना गंडा घालणार्‍या एका तोतया डॉक्टरला बंडगार्डन पोलिसानी अटक केली. तेजस अशोक शहा (वय.37,रा.कारेगाव,ता.शिरुर) असे त्याचे नाव आहे. त्याने महाराष्ट्रासह गुजरात,राजस्थान, झारखंड आणि इतर राज्यातील 50 ते 60 व्यवसायिकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, 100 पेक्षा अधिक जणांना संपर्क साधला आहे. शहा याच्या विरुद्ध विविध पोलिस ठाण्यात अशाप्रकारचे 9 गुन्हे दाखल आहेत. हॉस्पिटलमध्ये लिफ्ट बसविण्यासाठी ऑनलाईन कोटेशन मागवून त्यानंतर टेंडर पास झाल्याचे सांगत टेंडर फी व टेंडरसाठीची ई.एम.डी (अर्न मनी डिपॉझीट) रक्कम बॅक खात्यावर ट्रान्सफर करून घेत तो फसवणूक करत होता.

याप्रकरणी टिंगरेनगर येथील एका व्यवसायिकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादींचा लिफ्ट बसविण्याचा व्यवसाय आहे. शहाने याने त्यांना फोन केला होता. आपण तळेगावमधील ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथून बोलत असून हॉस्पिटलमध्ये लिफ्ट बसवायचे असल्याचे त्याने फिर्यादींना सांगितले. हॉस्पिटलच्या मेलवर लिफ्ट बसविण्यासाठीचे कोटेशन मागवून घेतले. त्यानंतर काही दिवसांनी परत त्यांना फोन करून तुमचे टेंडर पास झाले असून टेंडरची फी व ई.एम.डी रक्कम असे 56 हजार 400 रुपये एका बॅक खात्यावर मागवून घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतर देखील त्यांना लिफ्ट बसविण्याचे काम देण्यात आले नाही.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार यांनी पैसे ट्रान्सफर झालेले खाते, ईमेल, मोबाईल नंबरच्या तांत्रिक तपासावरून आरोपी शहा याला कारेगाव परिसरातील बाभूळसर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने देशभरातील सुमारे 50 ते 60 एलिव्हेटर व्यावसायिकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. यामध्ये राजस्थान, गुजरात, झारखंड या राज्यातील व्यावसायिकांचा समावेश असल्याचे बंडगार्डन पोलिसांकडून सांगण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक आश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, अंमलदार रामदास घावटे, सागर घोरपडे, किरण तळेकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

कोण आहे शहा

शहा याची व्यवसायिक पार्श्वभूमी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत आहे. त्याने डेन्टंल टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला आहे. त्यानंतर मुंबई येथे कृत्रिम दात तयार करणार्‍या कंपनीत तो नोकरी करत होता. मात्र काही दिवसानंतर त्याने आपला मुळ पेशा सोडून डॉक्टर असल्याची बतावणी करून लिफ्ट आणि मार्बल व्यवसायिकांना आर्थिक गंडा घालण्यास सुरूवात केली. त्याने महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यातील व्यवसायिकांना देखील आपल्या जाळ्यात खेचले.

शहा याने अनेक व्यवसायिकांची आर्थिक फसवणूक केली आहे.त्यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील व्यवसायिकांचा समावेश आहे. त्याच्यावर विविध ठिकाणी 9 गुन्हे दाखल आहेत. फसवणूकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जर अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी बंडगार्डन पोलिसांशी संपर्क करावा.

– प्रताप मानकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Back to top button