पुणे : वेळ नदीला अद्यापही पूर नाही | पुढारी

पुणे : वेळ नदीला अद्यापही पूर नाही

पेठ : पुढारी वृत्तसेवा : जोरदार पावसाने जिल्ह्यात सर्वत्र ओढे, नद्यांना पूर आला असला तरी सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील वेळ नदीला मात्र अद्याप पूर आलेला नाही. अद्याप बटाटासह सर्वच पिकांच्या लागवडी ठप्प असून कुरवंडी येथील बंधारा भरून वाहू लागल्याने लवकरच लागवडींना गती येणार आहे.

सातगाव पठार भागात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. अद्यापही नदीवरील सर्व बंधारे कोरडे आहेत. सोमवारी (दि.11) सायंकाळी 6 वाजता नदीचा प्रवाह सुरू झाल्यानंतर परिसरातील शेतकर्‍यांसमोरील हंगामाच्या आशा वाढल्या आहेत. इतके दिवस सातगाव पठार भागातील वेळ नदी कोरडी होती. नदीवर एकूण 9 कोल्हापूर पद्धतीचे सिमेंट बंधारे आहेत व कृषी खात्याचे काही बंधारे कोरडे आहेत. गेल्या आठ दिवसांपासून परिसरात रिमझिम पाऊस पडत आहे. मात्र, कुरवंडी ते पारगाव तर्फे खेड दरम्यान असलेले सर्व बंधारे भरून वाहणे आवश्यक आहे. इतके दिवस सातगाव पठार भागात जेमतेम पाऊस होता. मात्र, आता संततधार असल्याने लवकरच वेळ नदीचा प्रवाह पूर्णपणे सुरू होईल, असे चित्र आहे.

नदीला पाणी नसल्याने बटाटा लागवड सध्यातरी बंद आहे. शेतकर्‍यांनी बटाटा बियाणे खरेदी तसेच खते खरेदी करून ठेवली आहेत. लागवडीसाठी ट्रॅक्टर व मजूरही तयार आहेत, परंतु आता पाऊस उघडल्यास बटाट्यासह सर्वच पिकांची लागवड सुरू होणार आहे. बटाटा लागवड वेळेत न झाल्यास बटाट्याला मोड येतात. यंदा बटाटा बियाणे बाजारभाव प्रतिक्विंटल 3 ते साडेतीन हजारांपर्यंत आहे. त्यामुळे शेतक-यांना वारंवार बटाटे बियाणे पलटी करावे लागत आहेत. सध्या अनेक शेतकरी आपली शेततळी भरून घेत आहेत. वेळ नदीला पूर आला की, शेतकरी बिनधास्त होतात, असे नेहमीचे चित्र असते.

थूगाव ते पारगाव नदीपात्र कोरडे

मंगळवारी पावसाचा जोर कमी असल्याने कुरवंडीपासून ते पारगावतर्फे खेडपर्यंतचा वेळ नदी प्रवाह धिम्या गतीने सुरू आहे. सर्व कोल्हापूर पद्धतीचे सिमेंट बंधा-यांवरील ढापे काढून ठेवले जात आहेत. अद्याप थूगाव ते पारगावपर्यंत वेळ नदीपात्र कोरडे आहे, अशी माहिती सुनील तोत्रे व भावडी सोसायटी अध्यक्ष सोपान नवले यांनी दिली.

Back to top button