मारुंजी-इंदिरा कॉलेज रस्त्याची दुरवस्था | पुढारी

मारुंजी-इंदिरा कॉलेज रस्त्याची दुरवस्था

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे मारुंजी-इंदिरा कॉलेज रस्त्यावर चिखल साचला आहे. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरुन पायी चालणेही अवघड झाले आहे. मागील अनेक वर्षांत मारुंजी-इंदिरा कॉलेज रस्ता हा वाहतुकीसाठी महत्वाचा ठरला आहे.

या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे.  मारुंजी येथील मुख्य चौकातून इंदिरा कॉलेज रस्ता असलेल्या ठिकाणी अनेक नव्या इमारती उभारल्या जात आहे. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यासह येथे अनेक गोडाऊन, विविध वाहन कंपन्यांचे सर्व्हिस स्टेशन, शाळा आहेत.

अशा परिस्थितीत अनेकदा वाहने चालवणे आव्हानात्मक होत आहे. विशेषतः दुचाकी चालकांना वाहने चालविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकदा वाहने चालवताना घसरून पडण्याच्या घटना आणि त्यातून अपघात होत आहेत. ग्रामपंचायत आणि प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करूनदेखील काही मीटर रस्ता तयार करण्यात आला. कोटींची उड्डाणे घेणार्‍या ग्रामपंचायतीला मात्र या रस्त्याचा विसर पडला आहे का? असा सवाल ग्रामस्थ करता आहेत.

याबाबत येथील ग्रामस्थ दीपक बुचडे म्हणाले, की आयटीनगरी मारुंजीमधील मारुंजी ते मुंबई-बेंगलोर हायवेला जाणारा हा रस्ता आहे. खर तर या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. पायी चालण्यासारखा सुद्धा हा रस्ता राहिला नाही. रस्त्यावरुन गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागते.

Back to top button