पुणे : टाकळी हाजीत कृषी सेवा दुकाने फोडली | पुढारी

पुणे : टाकळी हाजीत कृषी सेवा दुकाने फोडली

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे सोमवारी (दि. 11) रात्री दोन कृषी सेवा केंद्र फोडून दुकानातील मिळेल ती रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे.

टाकळी हाजी येथील रोहन कृषी सेवा केंद्र व गहिनीनाथ कृषी उद्योग येथील पत्रा खोलून चोरट्यांनी आत प्रवेश केला व ड्रॉवरमधील रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. याच भागातील कृषी सेवा दुकाने फुटण्याची ही तिसरी वेळ आहे. एप्रिल, मे महिन्यात अशाच प्रकारे दुकाने फोडण्यात आली होती. त्यावेळी देखील चोरांच्या हाती जास्त काही लागले नव्हते, तरीही हीच दुकाने का लक्ष्य केली जात आहेत, हे मात्र विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

काही ठिकाणी कॅमेरे असल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. अवघ्या काही सेकंदात चोरी करून चोरटे पसार होत आहेत. असे प्रकार घडू लागल्याने व्यावसायिक तसेच रहिवासी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतर दुकानदारांनी आपल्या आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. तसेच बुधवारी संध्याकाळी सर्व दुकानदारांची टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्र येथे बैठक घेऊन स्वसंरक्षण व दक्षता घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी सांगितले.

Back to top button