तूर्तास नागरिकांच्या स्थलांतराची गरज नाही : आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने | पुढारी

तूर्तास नागरिकांच्या स्थलांतराची गरज नाही : आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘महापालिकेची आपत्कालिन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मात्र, सध्या तरी नदीच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांचे स्थलांतर करण्याची गरज नाही,’ अशी माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी दिली. शहर व परिसरात मागील आठवडाभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला आणि इतर धरणे भरली आहेत.

त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाणी सोडले जात आहे. नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीला पाणी आल्याच्या पार्श्वभूमीवर व पावसाळ्यात नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता विचारात घेऊन महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत करण्यात आला आहे.

नदीला पाणी आल्यानंतर अनेकवेळा नदीलगत राहणार्‍या नागरिकांचे तात्पुरत्या स्वरुपाचे स्थलांतर करावे लागते. या अनुषंगाने महापालिकेने लगतच्या शाळांमध्ये नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था तयार ठेवली आहे. तसेच अग्निशामक दल, क्षेत्रीय कार्यालयांचीही पथके सज्ज ठेवली आहे. मात्र, सध्या नदीमध्ये 13 ते 14 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.

त्यामुळे कोणत्याही नागरिकांचे स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही. मात्र, पाण्याचा विसर्ग 15 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यास काही भागातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करावे लागणार आहे. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचे सोनुने यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे शहरातून वाहणार्‍या नद्यांना विसर्ग वरचेवर वाढविला जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज आहे.

Back to top button