लोणावळा लाइनला ब्रेक का? | पुढारी

लोणावळा लाइनला ब्रेक का?

प्रसाद जगताप : पुणे : पुणेकर आणि मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पुणे-लोणावळा तिसर्‍या, चौथ्या मार्गिकेचे काम गेल्या 10 वर्षांपासून रखडलेे आहे. रेल्वेकडे या प्रकल्पाला 50 टक्के निधी उपलब्ध असून, आता हा प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या एकत्रित 50 टक्के निधीची प्रतीक्षा आहे.

आता नव्याने आलेले सरकार या प्रकल्पासाठी निधी देणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) यांच्याकडून या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाला अनेक ठिकाणी भूसंपादन करण्याची आवश्यकता आहे. भूसंपादन केल्यानंतर तेथील नागरिकांना त्याचा योग्य तो मोबदला द्यावा लागणार आहे. या प्रक्रियेसाठी अनेक वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, असे असले तरी आठ वर्षांपासून या मार्गिकेचा प्रस्ताव रखडलेलाच आहे. त्यामुळे प्रवाशांना पुणे-मुंबई वेगवान प्रवास होण्यासाठी वाट पाहावी लागेल.

सरकारचा 50 टक्के निधी हवा
एमआरव्हीसीच्या अधिकार्‍यांना याबाबत दै. ‘पुढारी’च्या वतीने विचारले असता, त्यांनी आमच्याकडून काम करण्याची तयारी असून, आम्हाला राज्य शासनाच्या 50 टक्के निधीची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, एमआरव्हीसीकडून अंबरनाथ येथे दोन दिवसांपूर्वीच याच मार्गिकांसाठी आवश्यक असलेल्या ब—ीजचे काम हाती घेण्यात आले आहे, असेही या वेळी अधिकार्‍यांनी सांगितले.

तिसर्‍या-चौथ्या मार्गिकेचा फायदा
पुणे-मुंबई प्रवास अधिक वेगवान होईल
शासनाच्या उत्पन्नात वाढ होणार
रेल्वे गाड्यांसाठी अतिरिक्त मार्गिका उपलब्ध
लोकलसेवा मोठ्या प्रमाणात वाढणार
खासगी वाहनांचा वापर कमी होणार

2003 साली या दोन्ही मार्गिकांना केंद्राने मंजुरी दिली आहे. आता बरेच दिवस झाले. या दोन्ही मार्गिकेसाठी रेल्वेसह स्थानिक प्रशासनाने निधीचा हिस्सा देणे आवश्यक आहे. मात्र, विविध राज्य सरकारे आली, सर्वच उदासीन आहेत. कोणीही निधी दिलेला नाही. आता रेल्वेच्या गाड्या आणि प्रवासीदेखील वाढले आहेत. यामुळे दोन मार्गिका लवकरच व्हाव्यात.
– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी संघ

Back to top button