‘बा रायगड परिवारा’च्या वतीने पुनर्स्थापना | पुढारी

‘बा रायगड परिवारा’च्या वतीने पुनर्स्थापना

सुनील जगताप :

पुणे : दुर्गसंवर्धनाच्या कार्यात अग्रेसर असलेल्या ‘बा रायगड परिवारा’च्या वतीने मुलूखमैदान तोफेची मूळ ठिकाणी पुनर्स्थापना करण्यात आली आहे. श्री रायगड महाराष्ट्रातील प्रत्येकाचे शक्तिस्थान आहे. किल्ले रायगडाचा एक अमूल्य असा ठेवा परिवारातील मावळ्यांना गवसला. एक महाकाय तोफ महादेव माळ येथील दरीत आढळली. ऐतिहासिक नोंदीनुसार या महादेव माळ येथे 4 तोफा होत्या.

प्रत्यक्षात मात्र तिथे एकच तोफ विराजमान होती. पुरातत्व विभागातील अधिकारी यांसोबत व मार्गदर्शनाखाली 8.3 लांब व अंदाजे 1300 ते 1400 किलो वजन असलेली ही महाकाय तोफ साधारण 60 फूट खोल दरी व तीव— उतारावरून वरती चेन पुली, दोरखंडच्या साहाय्याने बा रायगडच्या 50 सदस्यांनी महादेव माळ येथे तिला विराजमान केले.

मावळ्यांनी ही मोहीम सकाळी 8 वाजता सुरू करून दुपारी 3 वाजता फत्ते केली. या मोहिमेत केंद्रीय पुरातत्व विभागाचे राजेंद्र यादव,
आर. पी. दिवेकर, अविराज पवार, प्रवीण तांबोळी आणि रायगड प्राधिकरणाचे वरुण भामरे यांचे विशेष सहकार्य लागले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील गडकिल्ल्याचे संवर्धन करून भविष्यातील पिढीसमोर एक आदर्श उदाहरण परिवाराने ठेवले आहे. सर्व सहभागी सदस्य कॉलेज, नोकरी सांभाळून स्वखर्चाने मिळणारा वेळ संवर्धन कार्यासाठी देत आहेत.

Back to top button