पिंपरी : प्रभाग पुन्हा चारचे होणार? | पुढारी

पिंपरी : प्रभाग पुन्हा चारचे होणार?

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तांतरामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. त्याचा आगामी महापालिका निवडणुकीवर देखील परिणाम होणार आहे. सद्यस्थितीत तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक आयोगाचे कामकाज सुरू आहे. मात्र, ती प्रभागरचना भाजपसाठी सोयीस्कर नसल्यामुळे चार सदस्यीय पद्धतीने निवडणुका होतील, असे संकेत भाजप वरिष्ठ नेत्यांनी पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकार्‍यांना दिले आहेत.

मंत्रिमंडळ स्थापनेनंतर त्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात भाजप सत्तेत असताना फेब्रुवारी 2017 च्या महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली होती. याचा भाजपला फायदा झाला. राज्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेसह अनेक पालिकांमध्ये भाजपने सत्ता मिळवली.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय पध्दतीने निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. त्या प्रमाणे राज्य निवडणूक आयोगामार्फत प्रभागरचना तयार करण्यात आली. आरक्षण सोडत झाली असून, सध्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यावरील हरकतींवर निवडणूक विभाग काम करीत आहे.

दरम्यान, राज्यात सत्तांत्तर होऊन भाजप व शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट मिळून सरकार स्थापन झाले आहे. या सत्ता स्थापनेनंतर आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनिती बनविण्याचे काम भाजपमार्फत सुरू आहे. आगामी पालिका निवडणूक ही चार सदस्यीय पध्दतीने घेणे भाजपसाठी अधिक सोईस्कर आहे. तसा भाजपचा प्रयत्न आहे. त्याबाबत भाजपच्या पदाधिकार्यांच्या गाठीभेटी, बैठका सत्र सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या स्थानिक नेते व पदाधिकारी व माजी नगरसेवक यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.11) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तसेच नेते गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, सदाशिव खाडे, अमित गोरखे, तुषार हिंगे, शीतल शिंदे, राजेश पिल्ले, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, केशव घोळवे, अनुप मोरे, सुजाता पालांडे, जयश्री गावडे व पदाधिकारी उपस्थित होते.

या भेटीत भाजप नेत्यांनी आगामी निवडणुका चार सदस्यीय पध्दतीने होतील, असे संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळ स्थापनेनंतर ठोस निर्णय होतील. ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेवरील न्यायाप्रविष्ट बाबींचा विचार होईल. तोपर्यंत ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’च्या भूमिकेत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Back to top button