पुणे : धोकादायक इमारतींचा सर्व्हेच नाही, अतिधोकादायक 48 वाड्यांवर कारवाई | पुढारी

पुणे : धोकादायक इमारतींचा सर्व्हेच नाही, अतिधोकादायक 48 वाड्यांवर कारवाई

हिरा सरवदे : पुणे : पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून शहरातील धोकादायक वाड्यांना आणि इमारतींना नोटिसा दिल्या जातात. मात्र, 2015 नंतर शहरातील धोकादायक वाड्यांचा आणि इमारतींचा सर्व्हेच झालेला नाही. शहरात नेमक्या किती धोकादायक मिळकती आहेत, याची संख्याच प्रशासनाकडे नाही.

दरम्यान, महापालिकेने पावसाळ्यापूर्वी विविध पेठांमधील 448 धोकादायक वाड्यांना नोटिसा दिल्या असून, 48 वाड्यांवर कारवाई केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे. शहरातील कसबा पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, सदाशिव आणि नवी पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, गंज पेठ नाना पेठ, गणेश पेठ अशा विविध पेठांमध्ये चौरसाकृती आणि आयाताकृती आकाराचे शेकडो वाडे आहेत.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालिकेने अत्यंत धोकादायक (सी -1), दुरुस्ती आवश्यक (सी -2), रिक्त न करता दुरुस्ती योग्य (सी-3) अशी वाड्यांची वर्गवारी केली आहे. प्रशासनाने 2008 आणि 2015 मध्ये शहरातील धोकादायक वाड्यांचा सर्व्हे केला होता. त्यामध्ये प्रथम 1186 आणि 806 वाडे धोकादायक आढळले. यावेळी धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आलाच नाही. त्यानंतर पुन्हा शहरातील धोकादायक वाडे आणि इमारतींचा सर्व्हे झालाच नाही. त्यामुळे शहरात नेमक्या किती धोकादायक मिळकती आहेत, याची संख्याच प्रशासनाकडे नाही.

‘त्या’ इमारतींचे ऑडिट व्हावे
शहराच्या मध्यभागातील पेठांमध्ये असलेल्या वाड्यांचे दरवर्षी सर्व्हे केला जातो. धोकादायक वाड्यांना ते खाली करण्यासाठी नोटिसा दिल्या जातात. त्यानंतर अतिधोकादायक वाड्यांवर कारवाई करून ते उतरवले जातात. मात्र, शहरातील तीस वर्षे पूर्ण झालेल्या इमारती व बांधकामांचे दरवर्षी स्ट्रक्टरल ऑडिट करण्याची जबाबदारी इमारत मालकांची किंवा संबंधित सोसायट्यांची असते. याबाबत बांधकाम नियमावलीमध्ये स्पष्टता आहे. त्यामुळे तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या इमारतींचे संबंधितांनी स्ट्रक्टरल ऑडिट करून घेणे संबंधितांची जबाबदारी आहे, असे मत महापालिका अधिकार्‍यांनी व्यक्त केले.

बांधकामांचा दर्जा तपासण्याकडे दुर्लक्ष
पालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांंमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे झालेली आहेत. ही बांधकामे नवीनच असल्याने सध्या तरी त्याचा सर्व्हे करण्याची व त्याचा दर्जा तपासण्याची गरज भासत नाही. मात्र, पालिकेच्या जुन्या हद्दीमध्ये तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या जुन्या इमारती आणि बैठी घरे आहेत. या मिळकतींचा सर्व्हे आणि बांधकामांचा दर्जा तपासणे गरजेचे आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे.

Back to top button