पुणे : पद्मश्री पतसंस्थेत सव्वा कोटीचा अपहार | पुढारी

पुणे : पद्मश्री पतसंस्थेत सव्वा कोटीचा अपहार

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन (ता. हवेली ) येथील पदमश्री को- ऑप क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेत तब्बल सव्वा कोटी रुपयांची अफरातफर करणार्‍या संस्थेच्या तत्कालीन उपाध्यक्षासह, संस्थेच्या व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी व्यवस्थापकाला अटकही केली आहे.

संजय दिगंबर कांचन व व्यवस्थापक विकास मारुती लोंढे (रा. तुपेवस्ती, लोंढे चाळ, उरुळी कांचन) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी विकास लोंढे याला अटक केली आहे. गुन्हा दाखल झालेले संजय कांचन यांनी कांही दिवसापूर्वी आत्महत्या केलेली आहे.

रोख स्वरुपात काढली रक्कम

लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पद्मश्री को- ऑप क्रेडिट सोसायटी आहे. यामध्ये 2016-17 व 2017-18 या दोन वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर यांनी यशवंत पोंदकुले यांची नेमणूक केली होती. मागील दोन वर्षांचे वैधानिक लेखापरीक्षण केले असता संस्थेकडून ठेवीदारांच्या रकमेतून 83 लाख 26 हजार 304 रुपये एवढी रक्कम बँकेत भरलेली नसल्याचे दिसून आले. त्यांनी चौकशी करून कागदपत्रांची पाहणी केली असता, सदर रक्कम संजय कांचन व विकास लोंढे यांनी संगनमत करून रोख स्वरूपात काढल्याचे दिसून आले.

संजय दिगंबर कांचन यांनी संस्थेच्या इतर संचालकांच्या अनुपस्थितीमध्ये मासिक बैठक घेतली होती. नमूद बैठकीचे प्रोसिडींगमध्ये फक्त स्वत:ची स्वाक्षरी करून संचालकास माहिती न देता 45 लाख रुपयांची कर्ज प्रकरणे स्वतःच्या सहीने परस्पर मंजूर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार, सदरचा अहवाल मा. उप-निबंधक सहकारी संस्था, पुणे शहर, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था पुणे यांचे कार्यालयात सादर केला असता नमूदप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश यशवंत भागुजी पोंदकुले यांना दिले होते.

दरम्यान, पद्मश्री को- ऑप क्रेडिट सोसायटीचे सन 2016-17 व 2017-18 या दोन वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षणात उपाध्यक्ष संजय कांचन व व्यवस्थापक आरोपी विकास लोंढे यांनी संस्थेची एकूण 1 कोटी 28 लाख 26 हजार 304 रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, आरोपी विकास लोंढेला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची कोठडी दिली आहे.

Back to top button