पुणे: तळेगावात मान्सूनपूर्व कामाकडे दुर्लक्ष | पुढारी

पुणे: तळेगावात मान्सूनपूर्व कामाकडे दुर्लक्ष

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. प्रशासनाकडून मान्सूनपूर्व कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्टेशन भागात वतननगर, हिंदमाता भुयारी मार्गासमोर अंबिका पार्कच्या बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून ओढ्याचे स्वरुप आले आहे. तसेच, स्वप्ननगरीजवळ अनेक ठिकाणी पाणी साचत असून तेथे तळ्याचे स्वरुप आलेले आहे. इंद्रायणी वसाहत, तळेगाव-चाकण महामार्गावर इंद्रायणी कॉलेज समोर तळ्याचे स्वरूप आलेले आहे.

अनेक रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. खड्डयांचे साम्राज्य झाले आहे.अशा ठिकाणी वाहन चालविणेदेखील धोकादायक झाले आहे. अनेक वाहनचालक रस्ता बदलून लांब अंतरावरुन जात आहेत. प्रशासनाने या समस्यामध्ये लक्ष, द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. शहरात पावसामुळे जीवित, वित्त हानीचे अद्याप वृत्त नसून ही समाधानाची बाब आहे. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे तेथे भटक्या प्राण्यांचा वावर होत असून आरोग्यास अपायकारक होण्याची शक्यता आहे.

Back to top button