पिंपरी : वादग्रस्त चित्रफितीचा तपास करण्याचेे न्यायालयाचे आदेश

पिंपरी : आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी तपास करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने वाकड पोलिसांना दिले आहेत. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
याबाबत माहिती देताना काळे यांनी सांगितले की, श्री श्री रविशंकर यांच्या फेसबुक तथा युट्युब पेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला होता. त्यामध्ये समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे दाखविण्यात आलेले होते. अहमदनगरमधील एका निकालात न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे की, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत. याचा दाखला देत सदरील वादग्रस्त व्हिडिओ तत्काळ हटवून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी मी दोन वर्षांपासून पाठपुरावा केला.
यासंदर्भात वाकड पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त, मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी आणि आंदोलने केली होती. श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पुणे सत्र न्यायालयात दाद मागितली होती. सर्व पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने वाकड पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 202 अंतर्गत तपास करुन तत्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले असल्याचे काळे यांनी सांगितले.