59 वर्षीय रुग्णाला मिळाले नवजीवन; युवकाचे अवयवदान | पुढारी

59 वर्षीय रुग्णाला मिळाले नवजीवन; युवकाचे अवयवदान

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील 25 वर्षीय युवकाच्या अवयवदानाने यकृताच्या अंतिम टप्प्यातील आजाराने ग्रस्त असलेल्या 59 वर्षीय रूग्णाला नवजीवन मिळाले. या युवकाच्या अपघातानंतर त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर त्याला मेंदूमृत घोषित करण्यात आले. युवकाचे अवयव दान करण्याबाबत नातेवाइकांनी संमती दिल्यानंतर ग्रीन कॉरिडॉरमार्फत त्याचे अवयव पुण्यात आणण्यात आले. युवकाचे यकृत ऑटोइम्यून या आजाराने ग्रस्त असलेल्या 59 वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले.

सह्याद्री हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अबरार अली दलाल म्हणाले, ‘युवकाच्या नातेवाइकांच्या धाडसी निर्णयामुळे गरजू रूग्णाला नवजीवन प्राप्त झाले. वाहतूक पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्वांच्या कार्याला आमचा सलाम.’ प्रत्यारोपण टीममध्ये हेपॅटोबिलरी आणि यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. विभुते, डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. अपूर्व देशपांडे, हेपॅटोलॉजिस्ट डॉ. शीतल महाजनी, प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ डॉ. मनीष फाटक व टीमचा समावेश होता.

Back to top button