गुंतवणुकीवर परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कंपनीच्या शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची 5 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी इम—ानखान इनामदार (रा. बास्तेवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नीलेश अशोक भालेराव (वय 36, रा. महंमदवाडी रोड, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 15 जानेवारी 2022 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इनामदार याने स्वतःची टाईन एग्रो नावाच्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतविले तर आकर्षक परतावा भेटेल असे सांगितले होते. फिर्यादींना आरोपीने 50 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून, फिर्यादींचे शेअर ट्रेडिंगसाठी कोणतेही डी मॅट खाते नसताना, एजंट म्हणून काम करताना टाईन एग्रो शेअर्स स्पॉट खरेदी केल्याचे भासवून त्या शेअर्सची किंमत वाढून 5 लाख 48 हजार रुपये झाल्याचे सांगितले. मात्र तसे कोणतेही शेअर्स आरोपीने खरेदी न करता व त्याचा कोणताही परतावा दिला नाही. पैसे मागितल्यावर शिबीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.