खोदाईनंतर वरवरची ‘मलमपट्टी’; पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण | पुढारी

खोदाईनंतर वरवरची ‘मलमपट्टी’; पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण

पुणे : पुढारी वृत्तसेवा: खोदाईनंतर रस्ते पूर्ववत करताना करण्यात आलेल्या वरवरच्या मलमपट्टीमुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची गती मंदावल्याने वाहनचालकांना खड्ड्यांसह वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेकडे आतापर्यंत खड्ड्यांबाबत 500 हून अधिक तक्रारी आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते वगळता बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनचालकांची चांगलीच कसरत होत आहे. रस्त्यांवरील वाहतूक अत्यंत संथ झाली असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

पावसाची संततधार सुरू असल्याने खड्ड्यांची दुरुस्तीदेखील होताना दिसत नाही. तर अनेक चौकांमध्ये वाहतूक पोलिस नसल्याने पुढे जाण्याच्या नादात वाहतुकीचा खोळंबा होताना दिसतो. मध्यवर्ती शहरात अनेक ठिकाणी अरुंद गल्ल्यांमध्ये नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या चार चाकी वाहने कोंडीत भर घालत आहेत. यामुळे शाळंकरी विद्यार्थी आणि नोकरदारांनाही वेळेत शाळेत व कामाच्या ठिकाणी तसेच घरी परतण्यास विलंब होत आहे.

खड्ड्यांची प्रमुख कारणे
समान पाणीपुरवठा योजना, ड्रेनेजलाईनच्या कामासाठी खोदलेले डांबरी रस्ते सिमेंट काँक्रीटने बुजविण्यात आले. डांबरी रस्ते व काँक्रीटचे पॅचवर्क ज्याठिकाणी आहे तेथे खड्डे पडले आहेत. सिग्नल सिंक्रोनायजेशनसाठी चौकांमध्ये खोदाई करण्यात आली आहे. तेथे बरेच ठिकाणी ब्लॉक्स बसविले आहेत. याठिकाणी ब्लॉक्स व डांबरी रस्ता एकरूप न झाल्याने खड्डे पडले आहेत. शहरातील काही रस्त्यांची कामे अगदी पावसाळ्यापूर्वी करण्यात आली आहेत. या रस्त्यांवरील ड्रेनेज लाईन्सची झाकणे वर उचलली नाहीत. याठिकाणीही वाहनांमुळे झाकणांच्या कडेचा भाग खचून खड्डे तयार झाले आहेत.

सततच्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ज्याठिकाणी समान पाणीपुरवठा व ड्रेनेज लाईनची कामे झाली आहेत, त्या रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. सध्या पाऊस असल्याने ब्लॉक व विटा वापरून तात्पुरत्या स्वरुपात 400 खड्डे बुजविले आहेत. अद्याप 500 खड्डे बुजविणे बाकी आहे. पाऊस थांबताच युद्ध पातळीवर सर्व खड्डे बुजविण्यात येतील. यासाठी 15 क्षेत्रिय कार्यालयांमध्ये स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

                                                           – व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख

Back to top button