सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळली; आठवडाभरात अनेक वेळा घडला प्रकार | पुढारी

सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळली; आठवडाभरात अनेक वेळा घडला प्रकार

वेल्हे;  पुढारी वृत्तसेवा: सोमवारी (दि.11) सकाळपासूनच सिंहगड परिसरात अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीने किल्ल्याच्या घाट रस्त्यावर दरड कोसळली. दरम्यान, गेल्या आठवडाभरात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून पावसाळी पर्यटनासाठी गडावर येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरडी संरक्षित करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी पडून आहे. मात्र, पावसाळ्यानंतरच दरडी संरक्षित करण्याचे काम सुरू होणार आहे. तोपर्यंत वनविभागाला घाट रस्त्यावर जागता पहारा तैनात करावा लागणार आहे.

सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जगताप माची जवळील घाट रस्त्यावर दरड कोसळली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणी नव्हते. तसेच एका बाजूलाच दरड कोसळल्याने वाहतूकही बंद पडली नाही. मात्र पर्यटकांसाठी धोका निर्माण झाला आहे. सिंहगड विभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाळासाहेब लटके, वनरक्षक बाबासाहेब जिवडे यांनी नीलेश सांगळे, शंकर सांबरे, संदीप सांबरे, धनराज सांबरे आदी सुरक्षारक्षकांसह मुसळधार पावसातच दरडीचा ढिगारा बाजूला काढला.

दरम्यान, जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे गेल्या आठ दिवसांपासून घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. डोंगर कड्याच्या धोकादायक दरडी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोखंडी जाळ्या बसवून संरक्षित केल्या आहेत. मात्र, अवघ्या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील निसरड्या मुरुम व कड्याच्या दरडी संरक्षित करण्याचे काम निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात राहिले आहे.

घाट रस्त्यावर जागता पहारा
जोरदार पावसामुळे लहान दरडी कोसळत आहेत. मात्र, मोठ्या दरडी कोसळण्याचा धोका नाही. तरीही दरडी कोसळत असलेल्या ठिकाणी घाट रस्त्यावर वनखात्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षारक्षक तैनात केले आहेत, असे वनरक्षक बाबासाहेब जिवडे यांनी सांगितले.

दरड कोसळण्याचा धोका असल्याने घाट रस्त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. पावसाचा जोर कमी झाल्यावर तेथे संरक्षक जाळ्या बसवण्यात याव्यात.

                                                – नवनाथ पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य.

Back to top button