शिवसैनिकांनो, बळ द्या; पुन्हा उभे राहू! | पुढारी

शिवसैनिकांनो, बळ द्या; पुन्हा उभे राहू!

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, परंतु तुमची ताकद मला हवी आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, पुन्हा एकदा आपण जोमाने उभे राहू,’ अशी भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांना घातली. पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक मंगळवारी मातोश्रीवर झाली. या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहीर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी भाजपासह शिवसेनेतून बंड करून निघालेल्या आमदारांवर टीका केली.

तसेच हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हानही दिले. सध्याच्या घटनेवरून त्यांनी राज्यात कशा पद्धतीने घटनेची पायमल्ली करून कारभार सुरू आहे, याची माहिती दिली. एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, यावर त्यांनी बोट ठेवले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी डॉ. गोर्‍हे म्हणाल्या की, ‘यापुढे आपणाला एकजुटीने व ताकतीने काम करायचे आहे.’

पुण्यातील सेना ठाकरेंबरोबरच!
शिवसेनेतील बंडानंतर पुण्यातील सेना नक्की कोणाच्या मागे उभी राहणार, असा प्रश्न होता. मात्र, मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला अपवाद वगळता सर्व आजी-माजी पदाधिकारी हजर होते. त्यात प्रामुख्याने शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, विजय देशमुख, संजय भोसले, बाळा ओसवाल, विशाल धनवडे, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट यांचा समावेश होता. त्यामुळे पुण्यातील सेना ठाकरे यांच्या समवेत असल्याचे स्पष्ट झाले.

Back to top button