संततधारेने फळभाज्यांची आवक रोडावली | पुढारी

संततधारेने फळभाज्यांची आवक रोडावली

पुणे : पावसामुळे फळभाज्यांची तोड कमी झाल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक घटली. आषाढी एकादशी तसेच बकरी ईदमुळे फळभाज्यांना मागणीही कमी असल्याने सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी 80 ते 90 वाहनांमधून शेतमालाची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत आवक दहा वाहनांनी घटल्याचे सांगण्यात आले.

परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गुजरात येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेश येथून 30 गोणी मटार, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 2 टेम्पो तोतापुरी कैरी व 3 टेम्पो घेवडा, इंदौर येथून 7 टेम्पो गाजर तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची 8 ते 10 ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 400 ते 500 पोती, टोमॅटो 12 हजार ते 13 हजार क्रेटस, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरची 14 ते 15 टेम्पो, गवार 5 ते 7 टेम्पो, भेंडी 5 ते 7 टेम्पो, भुईमूग 70 ते 80 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा 80 ट्रक यांसह आग्रा, इंदूर आणि आग्रा व स्थानिक भागांतून बटाटा 30 ट्रक इतकी आवक झाली.

बाजारात पालेभाज्या महागच
बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने पालेभाज्यांच्या जुडीचे भाव तीस ते चाळीस रुपयांवर पोहोचलेले भाव कायम आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची 90 हजार जुडी व मेथीची 50 हजार जुडी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक 60 हजार जुड्यांनी घटली तर मेथीची आवक दहा हजार जुड्यांनी वाढली.

घाऊक बाजारात कोथिंबीरच्या भावात जुडीमागे 3 रुपये, कांदापात चार रुपये, पुदीना पाच रुपये आणि अंबाडीच्या भावात दोन रुपयांनी वाढ झाली आहे तर मुळ्याच्या भावात जुडीमागे तब्बल दहा रुपयांनी घट तर चाकवत दोन रुपयांनी घट झाली असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली़. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव 6 ते 25 रुपये तर किरकोळ बाजारात 10 ते 30 रुपये इतके राहिले.

 

Back to top button