विदेशी दारू वाहतूक करणारी गाडी पकडली | पुढारी

विदेशी दारू वाहतूक करणारी गाडी पकडली

पुणे : पुढारी वृत्तसेवा: अवैध दारू वाहतूक करणारी गाडी पकडून हडपसर पोलिसांनी 1032 विदेशी दारूच्या बाटल्यांसह इतर असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मागील एका महिन्यात हडपसर पोलिसांनी अवैध दारू व अमली पदार्थ वाहतुकीच्या 7 कारवाया केल्या आहेत. यामध्ये तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रीराम ज्ञानोबा तांबडे (वाघोली), दीपक वैैलास परांडे (32, रा. उबाळेनगर), योगेश अनंत मोराळे (22, रा. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

आरोपी हे मारुती इको गाडीतून गोवा ते पुणे अशी अवैध दारू घेऊन जात असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी, मंतरवाडी येथे सापळा रचून गाडी पकडण्यात आली. या वेळी गाडीतून 1032 दारूच्या बाटल्या, वाहन, मोबाईल असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील एका महिन्याच्या कालावधीत हडपसर पोलिसांनी दारू आणि अमली पदार्थ वाहतुकीच्या सात कारवाया केल्या. यामध्ये लाखोंचा माल जप्त केला आहे.

Back to top button