

नंदकुमार सातुर्डेकर :
पिंपरीः पिंपरी चिंचवड शहरातील शिधापत्रिका कार्यालयांनी रंगरूप व कामकाजाबाबत कात टाकली आहे. मानांकनासाठी प्रयत्न करत असताना रेशनिंग कार्यालयांचा बदललेला लूक सर्वसामान्यांना प्रभावित करत आहे. मात्र, दुसरीकडे या कार्यालयांच्या मनुष्यबळात कपात करण्यात आल्याने नागरिकांची कामे मार्गी कशी लागणार, असा प्रश्न केला जात आहे.
महागाईच्या काळात गोरगरीब जनता व मध्यमवर्गीय मेटाकुटीला आले आहेत. सर्वसामान्य माणसाला रेशनिंगचा मोठा आधार वाटत आहे . कोरोनाच्या काळात उद्योग व्यवसाय कोलमडले असताना अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील कार्डधारकांना रेशनिंग व्यवस्थेमुळे मोठा दिलासा मिळाला होता. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 253 रेशनिंग दुकाने आहेत. त्यात पिंपरी विभागात 77, चिंचवड विभागात 93 तर पिंपरी विभागात असलेल्या 83 दुकानांचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवडमधील रेशनिंग व्यवस्था चिंचवड झोन (परिमंडळ अ), पिंपरी झोन (परिमंडळ ज) व परिमंडळ फ अशा तीन विभागांत विभागली आहेत. चिंचवड परिमंडळमध्ये 40 हजार 979 कार्डधारक असून 1 लाख 62 हजार 151 लाभार्थी आहेत. पिंपरी परिमंडळात 35 हजार 318 कार्डधारक असून लाभार्थी 1 लाख 46 हजार 54 आहेत. भोसरी परिमंडळ विभागात कार्डसंख्या 41 हजार 527 असून. लाभार्थी 1 लाख 66 हजार 832 आहेत.
शहरातील परिमंडळ कार्यालयातून हा कारभार हाकला जात आहे. या कार्यालयामधून नवीन शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेवरील नाव वाढवणे, नाव कमी करणे, पत्ता बदलणे आदी कामकाज केले जाते. एकीकडे मानांकनाच्या स्पर्धेमुळे रेशनिंग दुकानांचे व कार्यालयांचे रुपडे पालटले आहे. तर, दुसरीकडे शिधापत्रिका कार्यालयांमधील मनुष्यबळ कमी करण्यात आल्याने सर्वसामान्यांची कामे वेगाने कशी होणार हा प्रश्नच आहे.
रेशनिंग कार्यालयात पूर्वी 10 कर्मचारी होते. ते आता 5 आहेत. महसूलचे कर्मचारी महसूलला अन पुरवठ्याचे पुरवठ्याला असे धोरण निश्चित केले गेल्याने कमी कर्मचार्यांमध्ये काम करावे लागणार आहे.
– दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी अ व ज