पिंपरी : शहरातील नियोजित पाणीकपात रद्द | पुढारी

पिंपरी : शहरातील नियोजित पाणीकपात रद्द

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱया पवना धरणात पाणीसाठा वाढत आहे. रविवारी (दि.10) सायंकाळी सहापर्यंत तो 28 टक्के इतका होता. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने 15 ऑगस्टपर्यंत धरण 100 टक्के भरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरावरील नियोजित पाणी कपात तूर्त रद्द झाली आहे.

पाऊस लांबल्याने धरण साठा सोमवारी (दि.4) 16.26 टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. संततधार कायम आहे. धरण क्षेत्रात आतापर्यंत 650 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 105 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणी साठा वाढून तो 28 टक्क्यांवर पोहचला आहे. आतापर्यंत एकूण 14 टक्के पाणीसाठा वाढला आहे. पावसाचे पाणी वाढू लागल्याने पवना नदीचे पात्रही भरून वाहू लागले आहे. दरम्यान, गेल्यावर्षी या दिवशी 34 टक्के पाणीसाठा होता.

जमीन भिजली असल्याने पाणी मुरण्याचे प्रमाण घटले आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास धरणाचा पाणी साठा वाढून धरण 100 टक्के भरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. धरणात पुरेसा पाणी साठा निर्माण झाल्याने तूर्त पिंपरी-चिंचवड शहरातील नियोजित पाणी कपात रद्द झाली आहे.

धरण 100 टक्के भरण्याची प्रतीक्षा
पवना धरण क्षेत्रात पाऊसाचा जोर कायम राहिल्यास धरण 15 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर नियोजित कपात रद्दचा अंतिम निर्णय होईल. आम्ही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत, असे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

Back to top button